भीती नको मात्र सतर्क  राहा, नागरिकांना आवाहन

पुणे : करोना विषाणू संसर्गाची टांगती तलवार शहरावर असतानाच आता बदलत्या हवेच्या परिणामातून इतर विषाणूजन्य आजारांची साथही शहरात दाखल झाली आहे. ताप, सर्दी, अंगदुखी अशी करोनासारखीच लक्षणे असलेल्या या आजारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, मात्र घाबरून जाऊ नका, सतर्क  राहा असे आवाहन आरोग्य यंत्रणांकडून नागरिकांना करण्यात येत आहे.

जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला, तरी पुणे शहरात पावसाने म्हणावी तशी हजेरी अद्याप लावलेली नाही. त्यामुळे वातावरणही विषाणूजन्य आजाराच्या वाढीसाठी पोषक असल्याचे दिसून येत आहे. त्याचाच परिणाम म्हणून ताप, सर्दी, अंगदुखी, डोके दुखी यांनी ग्रासलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे, तसेच ही सर्व लक्षणे करोना विषाणू संसर्गाची देखील असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, सद्यस्थितीत प्रत्येक ताप, सर्दी, खोकल्याचा रुग्ण करोनाचाच असेल अशी भीती बाळगणे योग्य नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

जनरल फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, बाह्य़रुग्ण विभागात ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले आहे. चिंतेची बाब अशी, की या सगळ्यांमध्ये आपल्याला करोनाची लागण झाल्याचे भय मोठय़ा प्रमाणावर दिसते. मात्र, या काळात दरवर्षीच साथीच्या आजारांचे रुग्ण सापडतात, हे नागरिकांनी लक्षात घ्यायला हवे. ताप, सर्दी, अंगदुखी जाणवल्यास तातडीने तुमच्या फॅ मिली डॉक्टरांचा सल्ला घ्या, विषाणूविरोधी औषधे सुरू करा. तीन दिवसांपेक्षा जास्त काळ ताप राहिला तर मात्र डॉक्टरांची भेट घेऊन पुढील चाचण्या करणे योग्य ठरेल. प्रत्यक्षात, बहुतांश रुग्णांमध्ये तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर प्रकृती बरी होत असल्याचे दिसत असल्याचे डॉ. भोंडवे यांनी सांगितले.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे साथ विकार तज्ज्ञ डॉ. अतुल मुळे म्हणाले, काही प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. अद्याप पाऊस सुरू झाला नसल्यामुळे हे प्रमाण आटोक्यात आहे, पाऊस सुरू झाला की डेंग्यूची रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. विषाणूजन्य दुखणे आले तर डॉक्टरांचा सल्ला तातडीने घेणे महत्त्वाचे आहे. शिवाय डेंग्यूचा फै लाव रोखण्यासाठी स्वच्छ पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.

काय काळजी घ्याल?

’ ताप, सर्दी, खोकला झाला असता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या.

’ पूर्ण विश्रांती घ्या, भरपूर पाणी, ताजे जेवण घ्या.

’ तीन दिवसांमध्ये बरे न वाटल्यास डॉक्टरांशी संपर्क  साधा.