कृष्णा पांचाळ, प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात करोनाने अक्षरशः थैमान घातले असून अनेकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. दोन्ही शहरात आतापर्यंत १९ जणांना करोनाची बाधा झाली आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील खूप मोठी आहे. करोनामुळे अनेक विद्यार्थी शहरात अडकून पडले आहेत. त्यांना गावी जाताही येत नाही आहे. यामुळे त्यांच्या जेवणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता विद्या जितेंद्र जोशी या गृहिणीने एक नामी शक्कल लढवली आहे. व्हाट्सअ‍ॅप चा वापर करून अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना त्या मोफत जेवणाचे डबे पोहचवत आहेत. त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मोफत डब्यांचा संदेश मित्र परिवाराच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठवला होता. तो गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला असून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे विद्या जितेंद्र जोशी म्हणाल्या आहेत.

करोनामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर भीतीच्या सावटाखाली आहे. प्रशासनाने कठोर पाऊलं उचलत नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. हॉटेल्स, मॉल आणि अनेक दुकानं बंद आहेत. यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जेवणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे विद्या जोशी या गृहिणी घरगुती जेवणाचे डबे तयार करून विद्यार्थ्यांना विनामुल्य पुरवण्याचे काम करत आहेत. व्हाट्सअ‍ॅपचा उपयोग करत मित्रमंडळींच्या प्रत्येक ग्रुपमध्ये गरजू विद्यार्थ्यांना मोफत जेवणाचे डबे मिळतील असा मेसेज त्यांना पाठवला होता.

विद्या जोशी यांना अनेक वेळा अंतर खूप असल्याने डबे पुरवणे शक्य होत नाही. मात्र, माझे व्हाट्सअ‍ॅपवरील मेसेज पाहून अनेक महिलांनी आम्ही यात पुढाकार घेऊ असे म्हणत डबे तयार करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील बऱ्याच भागात या महिला राहत असल्याने त्या-त्या भागातील विद्यार्थ्यांना डबे पुरवणे शक्य होत आहे असं विद्या जितेंद्र जोशी यांनी सांगितलं आहे. “माझ्या परीक्षेच्या काळात असच अनुभव आलेला होता. मला जेवण मिळालं नव्हतं. चक्कर येऊन पडले होते. ते या मुलांना भोगावं लागू नये म्हणून हा प्रयत्न आहे,” असं त्या सांगतात.