महापालिका शिक्षण मंडळाच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढवण्याबरोबरच शाळांचे सुशोभीकरण, स्वयंसेवी संस्थांचा कामकाजात सहभाग, जुन्या कागदपत्रांचे डिजिटलायझेन यासह अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात येणार असून मंडळाला आयएसओ मानांकन मिळावे, यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.
मंडळाचे अध्यक्ष रवी चौधरी यांनी सोमवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चौधरी यांनी विविध उपक्रम सुरू केले असून त्या उपक्रमांची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. मंडळाचे उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे, तसेच सदस्य बाळासाहेब जानराव, बाबा धुमाळ, मंजुश्री खर्डेकर, अमित मुरकुटे, नरुद्दीन सोमजी यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
मंडळाच्या कारभारात सुधारणा घडवण्याबरोबरच शिक्षणाचाही दर्जा सुधारणे, त्यात गुणात्मक वाढ करणे तसेच नावीन्यपूर्ण योजना राबवणे, असा कार्यक्रम हाती घेतल्याचे चौधरी म्हणाले. मंडळाच्या कार्यालयाला आयएसओ मानांकन मिळवण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असून त्यासाठी आवश्यक सुधारणा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळांचे सुशोभीकरणही करण्याची योजना आहे. तसेच सामाजिक संस्थांचा सहभाग वाढवून त्यांच्या माध्यमातून शाळांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचीही योजना असल्याचे चौधरी यांनी सांगितले. मंडळाच्या मुख्य कार्यालयात अनेक वर्षांची जुनी कागदपत्रे, तसेच फाईल्सचा मोठा साठा असून त्यांचे डिजिटलायझेशन करण्याचीही योजना हाती घेण्यात आली आहे.