पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ अ पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या हिमाली नवनाथ कांबळे या विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय सूर्यकांत गायकवाड यांना पराभूत केले. हिमाली कांबळे यांनी ७ हजार ८९९ मते मिळवत ४ हजार ५८३ मतांनी विजयी मिळवला. धनंजय गायकवाड यांना ३ हजार ३१६ मते मिळाली.

पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर हिमाली कांबळे म्हणाल्या की, पोटनिवडणुकीच्या सुरुवातापासून मोठं आव्हान होत. ही निवडणूक जिंकून वडिलांची स्वप्ने पूर्ण करायची होती. यासाठी जनतेने साथ दिली. पुढील काळात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार असून वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे, असे त्या म्हणाल्या. दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ७ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत केवळ २०.७८ टक्के मतदान झाले होते. यात भाजपच्या हिमाली कांबळे आणि राष्ट्रवादीचे धनंजय गायकवाड यांच्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून हिमाली कांबळे आघाडीवर होत्या. अखेर त्यांनी पोटनिवडणुकीत बाजी मारली.