महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षांपासून आठवी, नववी व दहावीचे वर्ग सुरू करावेत, असा निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी एकमताने घेण्यात आला. राज्य शासनाने आठवीच्या ८२ वर्गाना परवानगी दिली असली, तरी नववी व दहावीचेही वर्ग शिक्षण मंडळाने सुरू करावेत, तसेच गुणवान विद्यार्थ्यांच्या विद्यानिकेतन या शाळा बंद करू नयेत, असे आदेशही शिक्षण मंडळाला सभेत देण्यात आले.
प्रभाग क्रमांक २८ मध्ये महापालिकेची शाळा असून ती सातवीपर्यंत असल्यामुळे या शाळेत आठवीचा वर्ग सुरू करावा, असा प्रस्ताव किशोर शिंदे आणि प्रकाश ढोरे यांनी दिला होता. हा प्रस्ताव मंगळवारी सभेत मंजुरीसाठी मांडण्यात आल्यानंतर शिवसेनेचे संजय भोसले, प्रशांत बधे, आरपीआयचे गटनेता डॉ. सिद्धार्थ धेंडे, भाजपचे अशोक येनपुरे, धनंजय जाधव, राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, अप्पा रेणुसे, मनसेचे किशोर शिंदे, बाळा शेडगे आणि सभागृहनेता सुभाष जगताप यांनी या प्रस्तावाच्या अनुषंगाने महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. महापालिकेच्या शाळा सातवीपर्यंतच चालवल्या जात असल्यामुळे सातवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपुढे पुढील शिक्षणाची मोठी अडचण उभी राहते. या विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट रहाते, अशा तक्रारी या वेळी सदस्यांनी केल्या.
शिक्षण हक्क कायद्यानुसार करण्यात आलेल्या व्याख्येनुसार आठवीपर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक शिक्षण म्हणूनच धरले जाते. त्यामुळे आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करणे ही जबाबदारी महापालिका शिक्षण मंडळाचीच आहे, याकडे डॉ. धेंडे यांनी यावेळी लक्ष वेधले.
या चर्चेच्या निमित्ताने शिक्षण मंडळातर्फे अशी माहिती देण्यात आली की, सर्व ३०७ शाळांमध्ये आठवीचे वर्ग सुरू करण्याऐवजी पटसंख्या विचारात घेऊन आठवीचे ८२ वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्याला शासनाने मंजुरी दिली असून त्यानुसार जून २०१५ पासून हे वर्ग सुरू होतील. या निवेदनानंतर नववी, दहावीच्या वर्गाचे काय, अशी विचारणा सदस्यांनी केली. चर्चेनंतर मूळ प्रस्तावाला महापलिका शाळांमध्ये आठवी ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करावेत, अशी उपसूचना आणि ती सभेत एकमताने मंजूर करण्यात आली.
गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळातर्फे चालवल्या जाणाऱ्या विद्यानिकेतन या शाळा बंद करण्याची प्रक्रिया मंडळातर्फे सुरू करण्यात आली असली, तरी या शाळा बंद करू नयेत, अशी आग्रही भूमिका प्रशांत जगताप आणि अप्पा रेणुसे यांनी सभेत मांडली. शिक्षण मंडळातर्फे १९७० पासून सुरू असलेली ही विद्यानिकेतन बंद करू नयेत, अशी उपसूचना जगताप आणि रेणुसे यांनी सभेत दिली आणि ती एकमताने मंजूर करण्यात आली.

खासगी शाळांसाठी पालिकेचे विद्यार्थी 

महापालिका शिक्षण मंडळातील सातवीच्या विद्यार्थ्यांना आठवीच्या वर्गात खासगी शाळांमध्ये प्रवेश हवा असेल, तर तुमचे पाचवीचे दोन विद्यार्थी आम्हाला द्या, अशी मागणी शाळाचालकांकडून केली जाते आणि शिक्षण मंडळाचे काही अधिकारी मंडळातील विद्यार्थी त्या शाळांना देतात, हा माझा स्पष्ट आरोप आहे, असे सांगून मनसेचे किशोर शिंदे यांनी पटसंख्या कमी करण्याच्या या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सर्वसाधारण सभेत केली.