शहरविकासाचा निधी हवा तसा वळवला; पक्षाच्या जाहीरनाम्यालाही खो

महापालिकेच्या अंदाजपत्रकात सांस्कृ तिक भवने, नाटय़गृहे, कलादालने बांधणे आणि स्मारके उभारणे अशा कामांसाठी राखीव असलेल्या निधीवर ‘डल्ला’ मारल्यानंतर सायकल एकात्मिक आराखडा आणि वाहनतळाच्या जागा विकसित करण्यासाठी असेलेला एकूण वीस कोटी रुपयांचा निधी पळविण्याचा प्रकार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केला आहे. निधी पळविल्यामुळे अंदाजपत्रकातील महत्त्वाकांक्षी योजनांना फटका बसणार आहे आणि भाजपच्या जाहीरनाम्यालाही हरताळ फासला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या अंदाजपत्रकात प्रस्तावित असलेल्या कामांचा निधी प्रभागातील किरकोळ विकासकामांसाठी पळविण्याचा पायंडा नगरसेवकांनी गेल्या काही वर्षांपासून पाडला आहे. अंदाजपत्रकातील महत्त्वाकांक्षी योजनांचा निधी खर्च होणार नाही, असे लक्षात येताच तो निधी प्रभागातील किरकोळ विकासकामांसाठी वापरला जात आहे. याशिवाय अंदाजपत्रकात नगरसेवकांना मंजूर असलेल्या निधीतील कामेही बदलण्याचा नवा प्रकार सध्या सर्रास सुरू आहे.

शहराचे सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन नाटय़गृहे, कलादालने उभारण्याच्या कामांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र भाजपचे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी या भूमिकेलाच हरताळ फासत हा निधी त्यांच्या प्रभागातील किरकोळ कामांसाठी मंजूर करून घेतला होता. त्यानंतर आता एकात्मिक सायकल योजनेअंतर्गत सायकल मार्ग विकसित करण्यासाठी असलेली दहा कोटी रुपयांची रक्कम आणि वाहनतळांच्या जागा विकसित करण्यासाठीची दहा कोटी रुपयांची रक्कम विविध कामांसाठी वर्ग करण्यात आली आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत हे प्रस्ताव झटपट दाखल करून लगेच मान्य करून घेण्यात आले. आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथे समाधी स्थळ उभारण्याच्या भूसंपादनासाठी हा निधी वापरला जाणार आहे. शिळीमकर आणि हेमंत रासने यांनी तसा ठराव स्थायी समितीला दिला होता.

शहराचा निधी प्रभागातील कामांसाठी

सांस्कृतिक भवन, नाटय़गृह, कलादालने बांधणे, स्मारके उभारणे, शास्त्रीय संगीत, नृत्यकला, चित्रकला आदी कलांची प्रदर्शने भरविणे, कार्यशाळा, प्रशिक्षण यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतींमध्ये किंवा विभागानुसार सांस्कृतिक केंद्र उभारण्यासाठी चालू आर्थिक वर्षांच्या अंदाजपत्रकामध्ये एक कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी हा निधी मार्केटयार्ड-लोअर इंदिरानगर या त्यांच्या प्रभाग क्रमांक ३६ मधील विविध कामे करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी वर्ग करून घेतला होता. या निधीतून शंकर महाराज मठाजवळ भक्त निवास बांधणे, इंदिरानगर येथील दळवी सांस्कृतिक भवन येथे बहुउद्देशीय हॉल बांधणे, चिंतामणराव देशमुख शाळेसमोरील मिनी मार्केट विकसित करणे, अण्णा भाऊ साठे सभागृहामागील मोकळ्या जागेत बहुउद्देशीय संकुल उभारणे अशी कामे होणार आहेत.

विविध योजनांना भाजप नगरसेवकांकडूनच हरताळ

महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने प्रत्येक प्रभागात सांस्कृतिक केंद्र उभारणे, वाहनतळांच्या जागा विकसित करणे, सायकल मार्ग विकसित करणे या कामांना प्राधान्य दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही होऊ शकलेली नाही. त्यामुळे अंदाजपत्रकामध्ये या कामांसाठी निधी राखीव ठेवण्यात आला होता. मात्र तोही पळविण्यात आल्यामुळे स्वपक्षाच्या योजनांनाच भाजप नगरसेवकांकडून हरताळ फासला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.