News Flash

लोकजागर : यांचं काय करायचं?

नगरसेवक, आमदार यांचे चेहरे आनंदानं कसे फुलून गेले. फवारणीच्या यंत्राची सोय झाली. कार्यकर्त्यांना निमंत्रणं गेली.

आता आपली सोसायटी विषाणूमुक्त होणार, या कल्पनेनं मग रहिवाशांचे डोळेही आनंदानं भरून येऊ लागले. झालं.

मुकुंद संगोराम – mukund.sangoram@expressindia.com

यांचं काय करायचं, हा प्रश्न राज्यात आणि नंतर देशात टाळेबंदी लागू झाल्यापासून पडलाय.सतत घरात आणि दारात गरजू, हतबल आणि केविलवाण्यांची गर्दी असायची.  या दरबारात खुर्चीत बसून राजासारखे त्यांचे प्रश्न सोडवायची सवय लागलेली.  सगळं काही थांबलंय. घराबाहेर पडायची सोय नाही आणि घरात थांबायचीही. एरवी चौकाचौकात पोलीस हसायचा. आता तोही डोळे वटारून पाहतोय. पण या सगळ्यांना एक नामी युक्ती सापडली. रस्ते, इमारती, सोसायटय़ांमध्ये फवारणी करायची. इतर शहरात तर रस्तेच्या रस्ते धुवून काढायला सुरुवात झालेली. मग आपण कसं मागे राहायचं. लगेचच कार्यक्रमांची आखणी सुरू झाली. नगरसेवक, आमदार यांचे चेहरे आनंदानं कसे फुलून गेले. फवारणीच्या यंत्राची सोय झाली. कार्यकर्त्यांना निमंत्रणं गेली.  सगळ्यांनी अमुक सोसायटय़ांच्या दारात जमायचं ठरलं.  सगळे जमलेही. पण फवारणी सुरू होईना. सोसायटय़ात घरात कोंडून बसलेले सगळे खिडक्या आणि सज्जात आलेले. काय चाललंय ते त्यांच्या ध्यानातही येईना.  या अशा संपूर्ण बंदच्या काळात हे एवढे लोक एकत्र कसे जमले, याचंच सगळ्यांना कुतूहल. बऱ्याच वेळानं माननीयांचा फोटो असलेला भला मोठा फ्लेक्स आला.  तेव्हा कळलं, की सोसायटीत सोडियम हायपोक्लोराइड या द्रव्याची फवारणी होणाराय म्हणून. आता आपली सोसायटी विषाणूमुक्त होणार, या कल्पनेनं मग रहिवाशांचे डोळेही आनंदानं भरून येऊ लागले. झालं. काम सुरू झालं. सगळे जण मोठय़ा तोऱ्यात या फवारणीत सहभागी होऊ लागले.  तिथल्या रहिवाशांचा मसीहा झाल्याचा आनंद त्या नेत्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहू लागला. आपण काय करतोय आणि कशासाठी करतोय, हे समजण्याएवढं ज्ञान असण्याचं काही कारणच नव्हतं. करोनाला हरवण्याची ही युक्ती म्हणजे त्या विषाणूला रोखण्यासाठी मिळालेलं चोख उत्तरच. सारं जग जिवाच्या आकांतानं त्या विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ या रोगावर इलाज शोधतंय. पण आमच्या नेत्यांना ते उत्तर सापडलेलं पाहून मतदार राजा खूश होईल नाहीतर काय! म्हटलं नव्हतं, भाऊ/दादा/ताई/अक्का/ कोणतंही काम चुटकीसरशी करू शकतात. आपली अख्खी सोसायटी नाही का रंगवून दिली त्यांनी.  आतले खासगी रस्तेही पालिकेची यंत्रणा राबवून किती गुळगुळीत केले. थोरच ते. आमच्या उपमहापौरबाईंकडे बघा. त्यांनी तर तो फवारणीचा पंप आपल्या करकमलांत गच्च पकडून स्वत:च फवारणीला सुरुवात केली.  काय धन्य वाटलं म्हणून सांगू तुम्हाला. नेता असावा तर असा. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता रस्त्यावर कार्यकर्त्यांना घेऊन आपल्यासारख्या अजाण नागरिकांसाठी किती कष्ट उपसताहेत.  पुण्यासारख्या सुसंस्कृत आणि सुशिक्षित देशांत (?) करोनासारखा डोळ्यांनाही न दिसणारा एवढासा विषाणू येऊच कसा शकतो? आणि आलाच समजा, तर जिवंत राहूच कसा शकतो.. अशी भावना या अशा फवारणीच्या भरगच्च कार्यक्रमांमुळे समस्त पुणेकरांमध्ये पसरली तर नवल ते काय! ही जी फवारणी केली जाते, ती अतिशय मोजक्या आणि दूषित ठिकाणीच करायची असते. अन्यथा त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास होऊ शकतो. हे पुण्यातल्याच डॉक्टर मंडळींनी सांगूनही या नेत्यांच्या डोसक्यात शिरूच शकत नाही.  पालिकेच्या पैशात फवारणी करून आपलं नेतृत्व सिद्ध करण्याचा हा खटाटोप सरकारनंच थांबवला म्हणून. नाहीतर आपल्या पुण्याचं काही खरं नव्हतं राव. तरीही दशांगुळे उरणारा प्रश्न उरतोच. या नेत्यांना रस्त्यावरील पोलिसांनी पोकळ बांबूचे फटके कसे दिले नाहीत? त्यांचे कार्यकर्ते एवढय़ा जमावाने शहरात राजरोस हिंडूफिरू कसे शकतात? नेत्यांसाठी फ्लेक्स तयार करणारं दुकान कसं काय उघडं असतं? त्याला कोणी कसं नाही पकडत? असले फालतू प्रश्न विचारायचे नसतात. निदान पुणेकरांनी तरी. यांचं काय करायचं? ता. क. – पोलिसांना विनंती की, या सगळ्या हर्षभरीत कार्यक्रमांचे साद्यंत वृत्तान्त छायाचित्रांसह फे सबुकावर सापडू शकतील.त्या सर्वाना शोधणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे सहज शक्य आहे. जमेल का हे?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2020 11:38 pm

Web Title: corporator mla behaviour in corona pandemic
Next Stories
1 भाजीपाला, भुसारला तोटा नाही
2 संचारबंदीच्या काळात थेट बांधावरून शेतीमालाची विक्री
3 दिल्ली निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात पिंपरी-चिंचवडमधील ३२ जणांचा सहभाग
Just Now!
X