पुणे :  प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहराच्या अन्य भागातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत उघडी ठेवण्याचे आदेश असतानाही दुकानदारांना दुकाने दुपारीच बंद करण्यास भाग पाडले जात आहेत. कधी पोलीस यंत्रणा तर कधी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाबरोबरच पोलीस मित्रांची जबरदस्ती, धाक आणि दबावामुळे दुकानदारही दुकाने उघडत नसल्यामुळे सामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. या परिस्थितीमध्ये नागरिकांच्या या अडचणीच्या काळात नगरसेवक मात्र गायब असल्याचे चित्र आहे. दुकाने उघडी ठेवण्याबाबत पोलीस आणि अन्य यंत्रणांना नगरसेवक जाब का विचारत नाहीत किंवा रस्त्यावर उतरून प्रभागातील दुकाने सुरू करण्यासाठी नगरसेवक पुढाकार का घेत नाहीत, अशी थेट विचारणा आता नागरिकांकडूनच होण्यास सुरुवात झाली आहे.

शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून उर्वरित भागात जीवनावश्यक वस्तूंसह भाजीपाला, फळे, दूध विक्रीची दुकाने दररोज सकाळी सात ते सायंकाळी सात या कालावधीत सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. दुकाने बारा तास सुरू ठेवण्याचे स्पष्ट आदेश असतानाही पोलिस आणि पोलीस मित्रांकडून मात्र दुकाने बारा वाजताच बंद केली जात आहेत. कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रस्ता परिसर, सहकारनगर, डेक्कन, शिवाजीनगर परिसराबरोबच अन्य भागातही हेच चित्र आहे. पोलिसांकडून दुकाने बंद ठेवण्यास सांगितले जात आहे. कधी पोलीस मित्र दुकाने बंद पाडण्यास भाग पाडतात, अशा तक्रारीही दुकानदारांकडून होत आहेत. दुकाने बंद असल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दुकाने लवकर बंद होण्याच्या भीतीपोटी नागरिकांकडूनही दुकानांमध्ये गर्दी केली जात असल्याचे दिसून येत आहे. एका बाजूला जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद ठेवण्यास दुकानदारांना भाग पाडले जात असताना दुसऱ्या बाजूला मद्यविक्रीची दुकाने मात्र राजरोसपणे सुरू असल्याचे वास्तव आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडूनही भाजीविक्रीचे साहित्य जप्त करण्यात येत आहे. तर शेतकरी किंवा शेतकरी समूह-गटाकडून सोसायटय़ा, गृहप्रकल्पांमध्ये जाऊन थेट भाजी विक्री करणाऱ्याचे उपक्रमही कारवाईच्या भीतीपोटी थंडावले आहेत.

समस्या काय

* दुकाने सुरू राहण्यासाठी नगरसेवकांकडून पाठपुरावा नाही

* प्रभागामध्ये वस्तू वाटपाच्या कार्यक्रमात नगरसेवक व्यस्त

* अनेक ठिकाणी आवश्यकता नसताना र्निजतुकीकरण कक्ष

* दुकाने सुरू ठेवण्याची के वळ मागणी, ठोस प्रयत्न नाहीत

* नगरसेवकांकडून ना जाब ना शासकीय यंत्रणांकडे विचारणा

पोलीस आणि महापालिका यांच्यात आदेशाबाबत स्पष्टता नाही. दोन्ही यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवित आहेत. दुकाने बारा तास सुरू व्हावीत, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. पोलिसांकडेही नगरसेवक विचारणा करतात. मात्र आदेशाचे कारण पोलिसांकडून दिले जाते. नगरसेवकांनाही काही मर्यादा आहेत. मात्र आता दुकाने बारा तास सुरू राहण्यासाठी संबंधित यंत्रणांबरोबर चर्चा करण्यात येईल.

– मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे</strong>