महापालिकेच्या अंदाजपत्रकावरील चर्चेसाठी आणि अंदाजपत्रकावर बोलण्यासाठी पुण्यातील नगरसेवक किती जागरूक आहेत, याचे चित्र बुधवारी महापालिका सभेत पाहायला मिळाले. ही सभा सुरू होताना महापौर प्रशांत जगताप हे एकटेच व्यासपीठावर उपस्थित होते आणि सभागृहात माजी उपमहापौर आबा बागूल हे एकमेव नगरसेवक उपस्थित होते. सभा सुरू होताना आयुक्तांसह एकही अधिकारी व्यासपीठावर उपस्थित नव्हता.
महापालिकेचे आगामी आर्थिक वर्षांचे (सन २०१६-१७) अंदाजपत्रक स्थायी समितीने सर्वसाधारण सभेला सादर केले असून त्याला ३१ मार्चपर्यंत मंजुरी देणे आवश्यक आहे. तत्पूर्वी या अंदाजपत्रकावर महापालिका सभेत चर्चा होते. तशी चर्चा बुधवारपासून सुरू होणार होती. त्यासाठी सभा बोलावण्यात आली होती. ही सभा अकरा वाजता सुरू झाली तेव्हा १५७ नगरसेवकांपैकी केवळ दोनच जण सभेत उपस्थित होते आणि आयुक्त व दोन अतिरिक्त आयुक्तांपैकी एकही जण उपस्थित नव्हता. सभा सुरू होताना नगरसेवकांची संख्या अल्प असते. मात्र बुधवारी महापौर व एकच नगरसेवक असे चित्र सभागृहात होते. प्रत्यक्ष सभा सुरू झाल्यानंतर आस्ते आस्ते अन्य नगरसेवक येऊन त्यांच्या जागांवर बसू लागले.
नगरसेवक यायला लागल्यानंतर
अंदाजपत्रकावरील ही चर्चा महत्त्वपूर्ण आहे आणि तरीही या चर्चेला आयुक्त उपस्थित नाहीत, असा मुद्दा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी उपस्थित केला. मात्र न्यायालयाचे कामकाज असल्यामुळे आयुक्त मुंबईला गेले असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर काँग्रेसचे संजय बालगुडे यांनी सभा सुरू करता येणार नाही कारण गणसंख्या नाही, अशी हरकत घेतली. गणसंख्या घेतली गेली असती तर ती पूर्ण होऊ शकली असती. हे लक्षात घेऊन काँग्रेस आणि मनसेचे काही नगरसेवक त्यानंतर सभागृहातून बाहेर गेले. महापौरांच्या आदेशानुसार गणसंख्या घेण्यात आली. त्या वेळी सभेत ४३ नगरसेवक उपस्थित होते. प्रत्यक्षात उपस्थितीच्या नोंदवहीत ६० नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. अन्य नगरसेवक स्वाक्षरी करून सभागृहातून बाहेर पडले होते. या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी टीका केली. त्यानंतर अपुऱ्या गणसंख्येअभावी महापालिकेची ही सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली.

सभेसाठी पूर्ण वेळ देण्याची विनंती करणार
सभेची वेळ, सभेचे नियम आणि सभेचे संकेत पाळले गेलेच पाहिजेत या मताचा मी आहे. त्यामुळे मी माझ्या पहिल्या सभेपासूनच वेळेचे तंतोतंत पालन करण्याचे ठरवले आहे आणि मी ते करणार. पुणेकरांचे प्रतिनिधित्व महापालिका सभागृहात करायला मिळणे हे भाग्य आहे. त्यासाठी सर्व सदस्यांनी सभेला वेळ दिला पाहिजे. सभेला वेळे देणे म्हणजेच पुणेकरांना वेळ देणे आहे. महापालिका सभेचे महत्त्व लक्षात आणून देणारे पत्रही मी दोन दिवसांत सर्व नगरसेवकांना व्यक्तिश: पाठवणार आहे.
प्रशांत जगताप, महापौर