रुग्णांच्या कल्याणासाठी असलेले व निदान तसे दाखविणारे राज्याचे आरोग्य खाते दुसऱ्याच कुणाचे तरी ‘कल्याण’ करीत असल्याचे दिसते आहे. रुग्णांसाठी चाकांच्या खुर्च्या खरेदी करण्याच्या निमित्ताने हे ‘कल्याण’ साधण्यात आले आहे. गेल्या वर्षी खात्याने राज्यातील विविध सरकारी रुग्णालयांसाठी चाकांच्या ४४६ खुच्र्या खरेदी केल्या. विशेष म्हणजे एका खुर्चीची किंमत पाच हजारांहून कमी असताना प्रत्यक्षात एक खुर्चीसाठी साडेदहा हजार रुपये मोजण्यात आले आहेत. त्यामुळे लाखो रुपयांची ही अतिरिक्त रक्कम नेमकी कोणाच्या घशात गेली, हा एक प्रश्नच आहे.
राज्याच्या आरोग्य खात्याला भ्रष्टाचाराने किती खोलवर पोखरले आहे याचा एक लहानसा नमुना या चाकांच्या खुच्र्याच्या खरेदीवरून उघड झाला. कोल्हापूरचे माहिती अधिकार कार्यकर्ते सतीशचंद्र कांबळे यांनी माहिती अधिकारात या खुच्र्याच्या खरेदीबाबत माहिती मिळवली आहे. आरोग्य खात्याने २०१२-१३ मध्ये या खुच्र्याच्या खरेदीसाठी दोन निविदा प्रक्रिया राबवल्या होत्या. यातील एक निविदा प्रक्रिया चाकाच्या १०८ खुच्र्याच्या खरेदीसाठी तर दुसरी निविदा प्रक्रिया ३३८ खुच्र्याच्या खरेदीसाठी काढण्यात आली.

या दोन्ही प्रक्रियांमध्ये पनवेलमधील ‘वॉर्डन सर्जिकल’ या खासगी कंपनीला कंत्राट मिळाले. या कंपनीला मार्च २०१३ मध्ये चाकाच्या खुच्र्याचे कंत्राट दिले गेले. या कंत्राटात नमूद केल्यानुसार प्रत्येक खुर्ची कंपनीने शासनाला १० हजार ६६३ रुपयांना विकली आहे. तर शासनाने ४४६ खुच्र्यासाठी पहिल्या कंत्राटानुसार ११ लाख ५१ हजार रुपये तर दुसऱ्या कंत्राटानुसार ३६ लाख ४ हजार रुपये इतका खर्च या चाकाच्या खुच्र्यावर केला आहे. या कंत्राटावर सहसंचालक (आरोग्य सेवा) यांची सही देखील आहे.  

कंत्राटात नमूद केलेली चाकाच्या खुर्चीसाठीची वैशिष्टय़े पाहता कंत्राट दिलेल्या खुच्र्या अगदी सामान्य दर्जाच्या असल्याचे समोर येते. ६७ सेमीची रुंदी, ९२ सेमीची उंची असलेल्या या चाकाच्या खुच्र्यामध्ये कोणतीही खास तांत्रिक वैशिष्टय़े नाहीत. बाजारातील काही सर्जिकल कंपन्यांकडे चौकशी केली असता शासनाने नमूद केलेल्या या प्रकारच्या एका चाकाच्या खुर्चीची सध्याची किंमत सुमारे पाच हजार रुपयांपर्यंत असल्याचे समजले. असे असताना आरोग्य खात्याने अशा खुर्चीसाठी प्रत्येकी साडेदहा हजारांहून अधिक रक्कम का मोजली आणि अतिरिक्त रक्कम गेली तरी कुठे हे गुलदस्त्यातच आहे.