सध्या अवघ्या देशावर करोनाचं संकट आहे, तसेच महाराष्ट्रात देखील काही वेगळी परिस्थिती नाही. परंतु करोना महामारीवरून राज्यात चांगलंच राजकारण तापल्याचे दिसत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी यावरून राज्य सरकावर टीका केली आहे.

करोनाला हरवण्यासाठी भाजपा जेवढे प्रयत्न करत आहे, तेवढं महाविकासआघाडी सरकार करत नसल्याचे सांगत,  करोना महामारीविरोधात लढण्यास लागणाऱ्या पीपीई किट, तात्पुरत्या उभा करत असलेल्या कोविड सेंटर, मृतदेहाला लागणाऱ्या बॅगा यात या सरकारने भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. धारावीत दीडशे रुपयांना पीपीई किट मिळतं, ब्रँडेड साडेचारशे मग १३०० रुपयांना किट हे सरकार घेत असून, करोनाच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्यास मोकळे आहे असेही  पाटील यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- दूध दरवाढीसाठी ‘रयत क्रांती’कडून राज्यव्यापी महाएल्गार आंदोलन सुरू

दूध दर वाढीसाठी महाराष्ट्रात भाजपाकडून शनिवारी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी मावळमध्ये आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, याप्रसंगी पत्रकारांशी ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, करोना निर्मुलनासाठी आम्ही जेवढ करत आहोत तेवढं शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसपण नाही करत. महाराष्ट्रात साडेचार महिन्यांपासून 2 कोटी 88 लाख लोकांना जेवण दिलं. 40 लाख लोकांना किरणा सामानाचे पॅकेट्स दिले. नागरिकांची स्क्रिनिंग आम्ही करत आहोत. हिंजवडीत 104 बेडचं कोविड सेंटर उभारलं आहे. असे गावोगावी सुरू करत आहोत. कोणाकडे आम्ही दुर्लक्ष करत नाहीत.

आणखी वाचा- सांगली : इस्लामपूरमध्ये दुधाच्या गाड्या अडवून गरिबांना दूध वाटप

राज्य सरकारवर टीका करताना पाटील म्हणाले,  जीएसटीमधून १९ हजार कोटी आलेत तुम्ही एक रुपयांच पॅकेज सामान्य नागरिकांना दिले नाही? हे सरकार करोनाच्या नावाखाली भ्रष्टाचार करत आहे. मृतदेहासाठी बॅग घेत आहात त्यात भ्रष्टाचार, तात्पुरती कोविड सेंटर उभा करत आहात त्यात भ्रष्टाचार, पीपीई किट घेण्यात भ्रष्टाचार, धारावीत दीडशे रुपयांना पीपीई किट मिळतं, ब्रँडेड साडेचारशे, तुम्ही १३०० रुपयांना घेताय करोनाच्या नावाखाली भ्रष्टाचार करायला मोकळे आणि आम्ही सामान्य माणसाचे प्रश्न सोडवायचे नाहीत, असा सवाल करत, या महाविकास आघाडीच्या सरकारकडून शेतकऱ्यांना मारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही त्यांनी आरोप केला.

हे सरकार रोज असे निर्णय घेत आहे की सर्वसामान्यांना त्रास होईल, खत बी-बियाण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. खत मिळत नाहीत, हे सरकार बांधावर खत बी बियाणे देणार होते? कसलं बांधावर, दिवसभर रांग लावली तर एक खताच पोत मिळतंय का?. या सरकारने नेमकं ठरवलं आहे तरी काय? शेतकऱ्यांना मारून टाकायचय का? असे प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी केले.