स्तनांच्या कर्करोगात शस्त्रक्रियेद्वारे स्तन काढून टाकावा लागण्याचा धक्का पचवून ‘त्या’ पुन्हा जिद्दीने उभ्या राहिल्या आणि त्यांनी कर्करुग्णांना समुपदेशन करायला सुरुवात केली. पहिल्यांदा कर्करोग होऊन आठ वर्षे पूर्ण होत नाहीत तोच त्यांना फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान झाले. पण त्यावरही त्यांच्या इच्छाशक्तीने मात केली. या दोन्ही कर्करोगांमधून बाहेर पडण्याचा अनुभव सांगून त्या आता इतर कर्करुग्णांना प्रेरणा देत आहेत.
ही गोष्ट आहे कोथरूडच्या आरती हळबे यांची. हळबे या कर्वे रस्त्यावरील गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये मंगळवारी व शनिवारी कर्करुग्णांना मोफत समुपदेशन करतात. कर्करोगाचे नाव ऐकताच घाबरून जाणाऱ्या रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी स्वत:चा ९९२२०८४७०० हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे.
२००५ मध्ये हळबे यांना स्तनांचा कर्करोग तर २०१३ मध्ये फुफ्फुसांचा कर्करोग झाला होता. या दोन्ही अनुभवांबद्दल त्या म्हणाल्या, ‘‘पहिल्यांदा कर्करोग झाल्यावर धक्का बसला होता, पण तो बरा झाल्यावर पुन्हा उद्भवू शकतो ही जाणीव होती. त्यामुळे दुसऱ्या कर्करोग मी तुलनेने सहज स्वीकारू शकले. घरच्यांचाही मला उत्तम पाठिंबा मिळाला. स्तनांच्या कर्करोगासाठी वेळी मला केमोथेरपीची गरज भासली नव्हती, पण फुफ्फुसांच्या कर्करोगासाठी ही थेरपी घ्यावी लागली. केमोथेरपी घ्यायच्या कल्पनेने मला चक्क आनंद झाला होता! हे ऐकून आश्चर्य वाटेल! पण स्तनांच्या कर्करोगातून बाहेर पडल्यावर मी जेव्हा समुपदेशन सुरू केले, तेव्हा केमोथेरपीच्या परिणामांबद्दल मी रुग्णांना काही सांगू शकत नव्हते. दुसऱ्या कर्करोगात मला स्वत:ला केमोथेरपी काय हे कळले. त्यानंतर त्याविषयी मी अनुभवाने बोलू लागले. कर्करोगाचे निदान झालेले रुग्ण किंवा नातेवाईक जेव्हा समुपदेशनासाठी येतात, तेव्हा ते भीतीने हादरलेले असतात. जेव्हा मी त्यांना मला दोनदा कर्करोग होऊन गेल्याचे सांगते, तेव्हा त्यांचा विश्वासच बसत नाही, नंतर मात्र त्यांना दिलासा वाटतो.’’
स्तनांच्या कर्करोगात हळबे यांना एक स्तन काढून टाकण्याची (मॅस्टेक्टॉमी) शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली होती. ही शस्त्रक्रिया झालेल्या स्त्रियांना काही कालावधीनंतर विशिष्ट प्रकारची ‘प्रोस्थेसिस ब्रा’ वापरता येते. सहसा वाच्यता न केल्या जाणाऱ्या या विषयाबद्दलही हळबे मार्गदर्शन करतात. त्या म्हणाल्या, ‘‘काही कंपन्या मॅस्टेक्टॉमी झालेल्या स्त्री रुग्णांना दर वर्षी मोफत ब्रा पुरवतात. मॅस्टेक्टॉमी झाल्यानंतर त्या बाजूच्या हाताला एक प्रकारची सूज येण्याची शक्यता असते. यात लहान मऊ चेंडू वापरून हाताचे व्यायाम सुचवले जातात. हात सुन्न होऊ नये म्हणून रोज दोन पोळ्या लाटणे किंवा शस्त्रक्रियेनंतर काही महिन्यांनी दुचाकी चालवायला सुरुवात करणे हे मी सुरू केले होते. याबद्दलचे अनुभव मी सांगते, तसेच घरच्या घरी स्वस्तन तपासणी कशी करता येऊ शकते हेही सांगते.’’