|| विद्याधर कुलकर्णी

करोना संपेपर्यंत सोहळा न करण्याचा परिषदेचा निर्णय

पुणे : नाशिक येथे मार्चमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरू असताना शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन अजूनही विंगेतच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी म्हणजे मार्चअखेर नाट्यसंमेलन होणार का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

आगामी शंभरावे नाट्यसंमेलन राज्यभरात सर्वत्र घेण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने सुरुवात केली होती. हे औचित्य साधून राज्य शासनाने गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये दहा कोटी रुपयांची तरतूद केली होती. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून गेल्या वर्षी मार्चमध्ये नाट्यपंढरी सांगली येथून नाट्यसंमेलनाची सुरुवात होणार होती. मात्र करोना प्रादुर्भावामुळे टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने होणारे कार्यक्रम स्थगित करावे लागले. करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर जानेवारीपासून साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक झाली. नाशिक हे संमेलनस्थळ निश्चित झाल्यानंतर राज्य शासनाने संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक डॉ. जयंत नारळीकर यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी नियोजित संमेलनाध्यक्षांना निमंत्रण दिले आहे. संमेलनाची तयारी सुरू असून २६ ते २८ मार्च या कालावधीत संमेलन होणार आहे.

झाले काय?

’अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या

नुकत्याच झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये नाट्यसंमेलनाचा विषय कार्यपत्रिकेवर होता.

’नियामक मंडळाच्या सभासदांनी कार्यकारिणीवरच अविश्वास व्यक्त करत अर्थसंकल्प आणि विश्वस्तांच्या निवडीसह

सहा विषय फेटाळून लावले.

’ त्यामुळे नाट्यसंमेलनाच्या आयोजनाबाबत चर्चा होऊ शकली नाही. यंदाचे आर्थिक वर्ष संपण्यास ५० दिवस शिल्लक असल्याने मार्चअखेरीस नाट्यसंमेलन होण्याची शक्यता मावळली आहे, याकडे नियामक मंडळाच्या सदस्याने लक्ष वेधले.

शंभरावे नाट्यसंमेलन असल्याने शासनाने दहा कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र करोना संपेपर्यंत नाट्यसंमेलनाचे आयोजन करायचे नाही, असा निर्णय नाट्य परिषदेने शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये घेतला.  शंभरावे नाट्यसंमेलन असल्याने ते भव्य-दिव्य होणार आहे.  – शरद पोंक्षे,  प्रमुख कार्यवाह, मराठी नाट्य परिषद