साहित्य संमेलनात एका वक्तयाने देश हिटलरशाहीच्या उंबरठय़ावर असल्याचे विधान केले, तर देश हिटलरशाहीच्या उंबरठय़ावर नाही, असे विधान दुसऱ्या एका वक्त्याने केले. परंतु, हा देश हिटलरशाहीच्या नाही, तर  गांधी विचारांच्या उंबरठय़ावर आहे, अशी भूमिका माजी संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी रविवारी मांडली.

अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां अरुणा रॉय यांच्या हस्ते डहाके यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार, तर  राजेंद्र बहाळकर यांना समाजसेवा क्षेत्रातील विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी डहाके बोलत होते. केरळ शास्त्र साहित्य परिषदेस प्रदान करण्यात आलेला डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष मुरलीधरन यांनी स्वीकारला. नीतिन रिंढे, दत्ता पाटील आणि कृष्णात खोत यांना साहित्य, तर जमीलाबेगम पठाण आणि शहाजी गडहिरे यांना समाजकार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष राजीव भालेराव, सुनील देशमुख, मासूम संस्थेच्या मनीषा गुप्ते, रमेश अवस्थी, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ या वेळी उपस्थित होते.

डहाके म्हणाले, राष्ट्राच्या इतिहासात काळोखाचे क्षण असतात. हे वातावरण कोणाच्याही आरोग्यासाठी चांगले नाही. घनदाट काळोख असला तरी ठिकठिकाणी दिवटय़ा पेटत असतात. या दिवटय़ा स्वच्छ प्रकाश देतील. धर्मसत्ता आणि अर्थसत्तेचे राजकीय सत्तेवरचे नियंत्रण वाढले आहे.