घरामध्ये पेस्ट कंट्रोल केल्यानंतर दरवाजे बंदच ठेवल्यानं दाम्पत्याला प्राण गमवावे लागले. बुधवारी (13 फेब्रुवारी) पुण्यातील बिबेवाडी परिसरात ही घटना घडली. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर दरवाजे बंदच ठेवल्यानं विषारी वायूनं मृत्यू झाला.

पेस्ट कंट्रोलमुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. पुण्यात अशीच एक घटना समोर आली आहे. घरातील डास, कीटक घालवण्यासाठी पेस्ट कंट्रोल केले. पण त्यात दाम्पत्याचाच जिव गेला. पुण्यातील बिबेवाडी परिसरातील गणेश विहार सोसायटीत बुधवारी ही घटना घडली. अविनाश मजली (वय 64) आणि अपर्णा मजली (वय 54) अशी मयतांची नावे आहेत. घरात पेस्ट केल्यानंतर त्यांनी योग्य ती काळजी घेतली नाही. घराची दारे आणि खिडक्या बंदच ठेवल्यानं त्यांचा मृत्यू झाला.

यापू्र्वीही झाला होता दोन तरुणांचा मृत्यू –

ढेकूण घालवण्यासाठी खोलीत पेस्ट कंट्रोल केल्यानंतर दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. दोन वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. पेस्ट कंट्रोल करण्यात आलेल्या खोलीतच दोघे तरुण झोपले होते. सकाळी दोघेही मृतावस्थेत आढळले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. दोन्ही तरुण एका महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये काम करत होते. कॅन्टीन मालकाने त्यांना राहण्यासाठी एक खोली दिली होती. ढेकणांचा त्रास होत असल्याने खोलीत पेस्ट कंट्रोल करण्यात आलं होतं. पेस्ट कंट्रोल केलं असल्याने ते दोघे तीन दिवस मित्राच्या घरी राहिले. नंतर पुन्हा ते आपल्या खोलीवर आले होते.