अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना कायद्याने नुकसान भरपाई मिळते याची त्यांना माहिती नव्हती. मात्र, एका ओळखीच्या व्यक्तीकडून याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नुकसान भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल केला. या दाव्यामध्ये तडजोड होऊन दहा लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर विशाल पांडुरंग निम्हण यांचे २८ जानेवारी २००३ मध्ये अपघातात मृत्यू झाला होता. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसाला नुकसान भरपाई मिळू शकते यांची माहिती निम्हण यांच्या पत्नी कविता निम्हण यांना नव्हती. त्यामुळे त्यांनी गेली अकरा वर्षे नुकसान भरपाईसाठी अर्ज दाखल केला नव्हता. मात्र, त्यांच्या ओळखीच्या एका महिलेकडून त्यांना कायद्याने नुकसान भरपाई मिळू शकते याची माहिती मिळाली. मात्र, त्यांच्याकडे दावा दाखल करण्यासाठी कागदपत्रे नव्हती. त्यांनी वडगाव मावळ न्यायालयातून ही कागदपत्रे मिळवली.
कविता यांनी अॅड. वैशाली गव्हाणे आणि अॅड. अनिरुद्ध पायगुडे यांच्या मार्फत न्यायालयात १३ मार्च २०१४ रोजी दावा दाखल केला. त्यांनी इंडिया इन्शुरन्स कंपनीविरुद्ध १७ लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी म्हणून मागणी केली. न्यायालयात दावा दाखल झाल्यानंतर लोकन्यायालयात हे प्रकरण तडजोडीसाठी ठेवण्यात आले. न्यायाधीश डी. एम. देशमुख यांच्या पॅनलने हे प्रकरण तडजोडीने निकाली काढले. यामध्ये अर्जदार कविता यांना दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली.