ग्राहक न्यायालयाने दिलेल्या दणक्यानंतर सॅमसंग कंपनीच्या सेवा केंद्राने ग्राहकाचे पूर्ण पैसे परत केले असून त्याला न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नुकसान भरपाईही दिली आहे. विशेष म्हणजे सेवा केंद्राने ही रक्कम १५ दिवसांच्या आत दिली आहे.
नितीन महाबळ यांनी सॅमसंगचा मोबाईल घेतला होता. नवीन मोबाईल सहा महिन्यांमध्येच त्रास देऊ लागल्यानंतर त्यांनी तो तीन वेळा दुरुस्तीसाठी दिला, पण त्यातला बिघाड न सापडल्यामुळे तो दुरुस्त झालाच नाही. त्यांना त्याचे पैसेही परत मिळत नव्हते आणि मोबाईलही बदलून मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी ग्राहक न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता. न्यायालयाने कंपनीला ग्राहकाला योग्य सेवा न दिल्याबद्दल दोषी ठरवून हॅण्डसेटची पूर्ण किंमत म्हणजे २० हजार ८०० रुपये तसेच महाबळ यांना झालेल्या मानसिक, शारीरिक त्रासासाठी पाच हजार रुपये आणि खटल्याचे दोन हजार रुपये असे एकूण २७ हजार ८०० रुपये महाबळ यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले होते. याबाबतचे वृत्त गेल्या आठवडय़ात ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाले होते. या पाश्र्वभूमीवर महाबळ यांना पंधरा दिवसांच्या आत संपूर्ण नुकसान भरपाईचा धनादेशसुद्धा मिळाला.
सेवा केंद्राने संपूर्ण रक्कम देण्यासाठी अजून दहा दिवस लागतील, असे २३ जून रोजी सांगितले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी तुमचा धनादेश घेऊन जा असा फोन महाबळ यांना आला. महाबळ यांना १३ जूनला कोर्ट ऑर्डर मिळाली आणि त्यानंतर १५ दिवसांच्या आत म्हणजे २४ जूनला त्यांना पूर्ण रकमेचा धनादेश सव्र्हिस सेंटरकडून मिळाला, असे महाबळ यांनी सांगितले.