मोटारीने धडक दिल्यानंतर अपघातात अपंगत्व आलेल्या दुचाकीस्वाराला २३ लाख ७६ हजार नुकसान भरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे सदस्य व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे यांनी दिले. तसेच दावा दाखल झाल्यापासून अपंगत्व आलेल्या दुचाकीस्वाराला सात टक्के व्याजाने नुकसान भरपाईची रक्कम देण्यात यावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
आळंदी-मरकळ रस्त्यावर मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार दीपक सुरेश खांदवे (वय ३३, रा. मरकळ, ता.खेड) हे जखमी झाले होते. खांदवे यांना अपघातामुळे अपंगत्व आले. खांदवे यांनी त्यांचे वकील अ‍ॅड. जी. पी. शिंदे यांच्यामार्फत दी न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी आणि मोटारचालक सुनील ओझरकर यांच्याविरोधात मोटार अपघात न्यायप्राधिकरणात नुकसान भरपाई मिळावी म्हणून दावा दाखल केला होता.
या अपघातात दुचाकीस्वार खांदवे यांच्या कमरेखालच्या भागाला अपंगत्व आले होते. त्यांना हालचाल करता येणे शक्य नव्हते. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी सहा लाख रुपयांचा खर्च आला होता. त्यांना पत्नी आणि मुलगा आहे. ते एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करत होते. त्यांची शेती असून, नोकरी आणि शेती व्यवसायातून त्यांना दरमहा दहा हजार रुपये मिळत होते. त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न खांदवे यांच्यापुढे निर्माण झाला होता. त्यामुळे खांदवे यांना तीस लाख नुकसान भरपाई देण्यात यावी, असा अर्ज अ‍ॅड. शिंदे यांनी न्यायालयात केला होता.
खांदवे हे न्यायालयीन सुनावणीसाठी व्हीलचेअरवरून न्यायालयात आले होते. मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे सदस्य व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे यांनी दावा दाखल केलेल्या तारखेपासून खांदवे यांना सात टक्के व्याजाने २३ लाख ७३ हजार ३०० रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश नुकताच दिला.