पुणे : वाहन परवाना नसल्याचे कारण दाखवून दुचाकीस्वार शेतकऱ्याचा अपघाती विमा फेटाळणाऱ्या विमा कंपनीला नुकसान भरपाई देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले. वार्षिक ७ टक्के व्याजदराने दोन लाख रुपये नुकसान भरपाई तसेच दाव्याचा खर्च देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सुनिता गोरख चव्हाण (रा. कुसेगाव, ता. दौंड) यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. शिवाजीनगर शाखेचे व्यवस्थापक तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्या विरोधात अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात दावा दाखल केला होता. शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई देण्याची मागणी चव्हाण यांनी केली होती. सुनिता यांचे पती गोरख २५ ऑगस्ट २०१६  रोजी  दुचाकीवरुन उंडवडी भागातून जात होते. त्यावेळी त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. अपघातानंतर सुनिता यांनी तलाठय़ाकडे कागदपत्रे सादर करून दावा दाखल केला होता. मात्र, त्यांचा दावा नाकारण्यात आला होता.

त्यामुळे त्यांनी ग्राहक मंचात दावा दाखल केला होता. दाव्याची रक्कम तसेच २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली होती. विमा कंपनीकडून दाव्याला विरोध करण्यात आला होता. विम्याच्या अटीनुसार दुचाकीस्वाराकडे वाहन परवाना असणे आवश्यक आहे. मात्र, गोरख चव्हाण यांच्याकडे परवाना नसल्याने ते अपात्र असल्याचे म्हणणे कं पनीकडून मांडण्यात आले होते. ग्राहक मंचाने कृ षी अधिकारी कार्यालयाकडे नोटीस बजावली होती. मात्र, सुनावणीसाठी कोणीही हजर राहिले नव्हते. गोरख चव्हाण यांचा अपघात त्यांच्या चुकीमुळे झाला, याबाबत कोणतेही पुरावे ग्राहक मंचाकडे सादर करण्यात आले नाहीत. त्यामुळे अपघाताबाबत कोणाताही निष्कर्ष काढणे योग्य ठरत नाही, असे ग्राहक मंचाकडून स्पष्ट करण्यात आले.