विवाहानंतर पतीने सोडून दिल्यामुळे दोन मुलांची जबाबदारी त्या महिलेवर येऊन पडली होती. मुलांना घेऊन तिने जगण्यासीठा संघर्ष सुरू केला; पण तिची धडपड अपुरी पडायला लागली. अखेर तिने पतीकडून पोटगी मिळावी म्हणून न्यायालयात अर्ज केला. कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार या महिलेच्या पतीने त्याच्या पत्नीला दरमहा तीन हजार रुपये पोटगी द्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला. पण गेल्या दीड वर्षांपासून त्याने पत्नीला झुलवत ठेवले. त्यामुळे पतीकडे पोटगीची ५१ हजार रुपयांची थकबाकी झाली. शेवटी न्यायालयाने पतीची संपत्ती जप्त करावी, असे आदेश काढले आणि पतीला अटक करण्याचेही वॉरन्ट काढले.
हडपसर येथील हिंगणेमळा येथे राहणाऱ्या या पतीविरुद्ध पत्नीने कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायद्यानुसार न्यायालयात पोटगीसाठी दावा दाखल केला होता. या दाव्यात पती त्याच्या पत्नीला व दोन मुलांना सांभाळत नसल्यामुळे न्यायालयाने पतीने दरमहा तीन हजार रुपये पोटगी द्यावी असे आदेश दिले होते. पत्नी अशिक्षित असून तिच्यावर दोन मुलांची जबाबदारी आहे. पत्नीकडे उत्पन्नाचे साधन नाही, यासाठी तिला पोटगी दिली जाणार होती. न्यायालयाने पोटगी देण्याचे आदेश दिल्यानंतरही त्या आदेशाकडे संबंधित पतीने दुर्लक्ष करीत ऑगस्ट २०१३ ते जानेवारी २०१५ या कालावधीत तब्बल ५१ हजार रुपयांची पोटगी थकविली. त्यामुळे ही थकित रक्कम मिळावी म्हणून पत्नीने अॅड. चेतन भुतडा यांच्या मार्फत न्यायालयात अर्ज केला होता.
या प्रकरणी न्यायालयाने पोटगी थकल्याची दखल घेत पतीची जंगम मालमत्ता जप्त करून ५१ हजार रुपये वसूल करावेत, असे आदेश दिले. तसेच पतीने ही रक्कम न दिल्यास जप्त केलेल्या मालमत्तेची विक्री करावी व त्यातून पत्नीला पोटगी द्यावी यासाठी वॉरन्ट काढले आहे. या आदेशाची हडपसर पोलिसांनी अंमलबजावणी करावी असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी पती व पोलीस हे संगनमत करून कार्यवाहीकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे न्यायालयाने हडपसर पोलिसांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पण, तरीही कारवाई न झाल्यामुळे पतीच्या विरोधात अटक वॉरन्ट काढावे म्हणून न्यायालयाकडे अर्ज केला होता. तो न्यायालयाने मंजूर केला असल्याची माहिती अॅड. भुतडा यांनी दिली.