ग्रामीण भागाला सर्वाधिक फटका; टाळेबंदीमध्ये शिथिलता आणल्यानंतर प्रसार

पुणे : टाळेबंदीमध्ये शिथिलता आणल्यानंतर परजिल्ह्य़ातून पुण्यात एक लाख ४८ हजार नागरिक आले आहेत. त्यामुळे करोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील २०३ करोना बाधितांपैकी १६८ जण बाहेरून आलेले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गुरुवारी दिली.

करोनाच्या सद्य:स्थितीबाबत दूरचित्रसंवादाद्वारे पत्रकारांना जिल्हाधिकारी राम यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘गेल्या काही दिवसात ग्रामीण भागात एक लाख ४८ हजार नागरिक बाहेरील जिल्ह्य़ांमधून आले आहेत. त्यामध्ये मुंबईतून आलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.

ग्रामीण भागात २०३ करोनाबाधित असून त्यापैकी १६८ बाहेरून आलेले आहेत. त्यामुळे बाहेरून आलेल्या नागरिकांना घरी किंवा संस्थात्मक विलग करणे, त्यांची वैद्यकीय तपासणी करणे ही कामे करण्यात येत आहेत. प्रशासनाचे अधिकारी, आरोग्य कर्मचारी हे बाहेरून आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवून आहेत. मात्र, काही नागरिक प्रशासनाच्या निदर्शनास आलेले नाहीत. स्थानिकांनी ही बाब लक्षात आणून दिली आहे’.

ग्रामीण भागात सहा हजार शिक्षक, आशा सेविकांकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयांमध्ये बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. गंभीर  रुग्णांवरही  रुग्णालयांमध्येच उपचार करण्याचे नियोजन आहे, असेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

बाहेरील प्रवाशांमुळे शहरातही धोका

पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील नागरिकांना टाळेबंदीतून काही प्रमाणात सूट देण्यात आली असली, तरी पुणे शहरातील नागरिकांना सूट देण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर १ जूनपासून प्रतिबंधित क्षेत्रे वगळता अन्य ठिकाणचे व्यवहार सुरळीत करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, बाहेरील जिल्ह्य़ांमधून येणाऱ्या प्रवाशांमुळे ग्रामीण भागाप्रमाणेच शहरातही करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याचा धोका आहे.