पुणे शहरात करोनाबाधित रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ काही केल्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. शहरात आज दिवसभरात नव्याने ८७६ रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या ९५ हजार ३७३ एवढी झाली आहे. आज दिवसभरात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज दिवसाअखेर शहरात करोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या २ हजार ३०४ पर्यंत पोहचली आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १३८४ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज दिवसाअखेर ७८ हजार ०७० रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

अवश्य वाचा – पुण्याचे महापौर करणार प्लाझ्मा दान !

दरम्यान दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरात, सोमवारी दिवसभरात ५९८ करोना बाधित रुग्ण आढळले असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. आज करोनामुक्त झालेल्या एक हजाराहून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधित रुग्णांची संख्या आता ५० हजारांच्या उंबरठ्यावर असून आज दिवसाअखेरीस ही संख्या ४९ हजार ३३० वर पोहचली आहे. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ४५६ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.