गोवंश हत्या बंदीचा कायदा राबविणे म्हणजे सध्याचे भाजपा व शिवसेनेचे सरकार शेतक ऱ्यांच्या हत्याच करत आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. गोवंश हत्या बंदी कायद्याबाबत शेतकरी संघटना व अल कुरेश व्यापारी संघटनेच्या वतीने पुण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी व्यापारी संघटनेचे सादिक इसाक कुरेशी उपस्थित होते.
भाजप आणि शिवसेना सरकारने गोवंश हत्या बंदी कायदा राबवण्याचे धोरण घेतले असून, त्यावर नुकतीच राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. मात्र, या विरोधात शेतकरी संघटना व व्यापारी संघटना विरोधा असल्याचे सांगून पाटील म्हणाले, भाजप व शिवसेना सरकारने राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवताना किंवा त्यापूर्वी साधी चर्चाही याबाबत केली नाही. गोवंश हत्या बंदी कायदा म्हणजे शेतक ऱ्यांच्या हत्या असून, कायद्यामुळे शेतक ऱ्यांना जनावरे पाळणे अवघड होणार आहे.
जनावरांचे विक्री व्यवहार बंद होणार आहेत. दुष्काळी परिस्थितीत जनावरे जगविण्याचे संकट उभारले आहे. मारके, खराब जनावरांचे करायचे काय? असा प्रश्न उभा राहायला आहे. त्याप्रमाणे जनावरे विक्री, मांस विक्री, वाहतूक करणाऱ्या घटकांसमोर रोजगाराचाही प्रश्नही निर्माण होणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणविसांचे सरकार शेतक ऱ्यांच्या मुळावरच उठले आहे की काय, अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात तयार झाली आहे.  
या विरोधात जनआंदोलन उभारण्यात येणार असून राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचेही रघुनाथ पाटील यांनी सांगितले. दरम्यान सरकारने चर्चेसाठी बोलवले, तर त्यासाठी आम्ही तयार आहोत.