डॉक्टर म्हणून कार्यरत असतानाही मातीमध्येच रमणारे.. शाडू मातीच्या गोळ्याला आकार देत त्यातून व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे.. परिचित व्यक्तीचा अर्धपुतळा घडवून ‘चेहरे’ प्रकाशात आणणारे.. दंतवैद्यक म्हणून कार्यरत असलेल्या मुकुंद राईलकर यांनी केवळ छंद म्हणून घडविलेले अनेक परिचित ‘चेहरे’ मंगळवारपासून (२९ डिसेंबर) पुणेकरांना पाहता येणार आहेत.
वेगवेगळ्या क्षेत्रात केवळ पुण्याचेच नाही तर महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव जागतिक पातळीवर नेणारे परिचित ‘चेहरे’ हे पुणेकरांना शिल्पकृतीतून भेटणार आहेत. रुग्णाचे दात काढणाऱ्या डॉ. मुकुंद राईलकर यांनी आपल्या कसबी हातांच्या कलाकुसरीने नटलेली शिल्प घडविली आहेत. ज्या नामवंत व्यक्तिमत्त्वांमुळे पुण्याचे नाव जगभर उज्ज्वल झाले अशा काही व्यक्तिमत्त्वाचे चेहरे दंतवैद्यक असलेल्या मुकुंद राईलकर यांनी घडविले आहेत. आधी शाडू मातीमध्ये हे व्यक्तिमत्त्व साकारून मग त्यांनी फायबर ग्लासच्या पक्क्य़ा शिल्पामध्ये रूपांतर केले आहे. परिवर्तन संस्थेतर्फे डॉ. राईलकर यांच्या शिल्पांचा समावेश असलेले ‘चेहरे’ हे प्रदर्शन मंगळवारपासून भरविण्यात येत आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, पालकमंत्री गिरीश बापट, ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य आणि डॉ. के. एच. संचेती यांच्या उपस्थितीत सकाळी साडेदहा वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे गुरुवापर्यंत (३१ डिसेंबर) सकाळी दहा ते रात्री साडेआठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
दंतवैद्यक शास्त्राचा अभ्यास करताना दात करायला लावतात. हे करताना कधी मी बेडूक, ससा, साप असे प्राणी बनवू लागलो तर, कधी माणूस. ही शिल्पे करण्याची आवड तीन दशकांपूर्वीच लागली. केवळ चेहरे (बस्ट) बनवायचे ही कला अवघड आहे. एखादे व्यक्तिमत्त्व केवळ चेहऱ्यातून अर्धपुतळ्याद्वारे घडविणे ही कठीण कला आहे. पुण्यातील मान्यवर हा विषय चेहरे या प्रदर्शनातून रसिकांसमोर येणार आहे. ३५ मान्यवरांपैकी काहींच्या घरी जाऊन तर, काहींची त्यांच्या छायाचित्रांच्या माध्यमातून शिल्प घडविले आहे, असे डॉ. मुकुंद राईलकर यांनी सांगितले.