आगामी दोन-तीन वर्षांत पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि जुन्या महामार्गावर ‘ग्रीन कॉरिडॉर’ची निर्मिती केली जाणार आहे. या दोन्ही मार्गावर सीएनजी वाहनांसाठी पंप उपलब्ध करून दिले जाणार असल्याची घोषणा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी शनिवारी केली.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल), बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ‘क्लीन-ग्रीन-स्मार्ट पुणे’ या अभियानाचे उद्घाटन धर्मेद्र प्रधान यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार अमर साबळे, श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, माजी खासदार प्रदीप रावत, एमजीएनएलचे अध्यक्ष आय. एस. राव, संचालक राजेश पांडे, सचिव आशुतोषजिंदाल, गेल गॅसचे अध्यक्ष बी. सी. त्रिपाठी या वेळी उपस्थित होते.
लहानपणापासून पुण्याविषयी ऐकून होतो. विधानसभा निवडणुकीपूर्वी १५ दिवस पुण्यामध्ये राहण्याचा काळ आनंददायी होता. पुणे ही केवळ सांस्कृतिक नगरी नाही तर देशाचे बौद्धिक केंद्र आहे, असे सांगून प्रधान यांनी ‘स्वच्छ-सुंदर-हरित पुणे’ करण्यामध्ये पेट्रोलियम मंत्रालय आपले योगदान देईल, अशी ग्वाही दिली. ते म्हणाले, आगामी ३० वर्षांत घरगुती वापराबरोबरच उद्योगधंद्यांनाही गॅस पुरविण्याचा मानस आहे. हे उद्दिष्ट साध्य करून देशातील कार्बनचे उत्सर्जन ३५ टक्क्यांनी कमी करण्याचा सरकारचा मानस आहे. भविष्यामध्ये इंधनांच्या किमती वाढण्याची शक्यता असल्याने उद्योगांमध्ये गॅसचा वापर वाढविण्याची आवश्यकता आहे. हा स्रोत स्वस्त, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या देशामध्ये १५ कोटी नागरिक पीएनजी (पाइप नॅचरल गॅस) वापरत आहेत. पुण्यामध्ये ही संख्या २१ हजार असून येत्या वर्षांत ही संख्या ५० हजापर्यंत नेण्याचा प्रयत्न राहील. देशभरात ३५ लाख नागरिकांनी एलपीजी गॅस सिलिंडरवरील अनुदान घेणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे गरिबांना गॅस कनेक्शन देता येणे शक्य होणार असल्याचेही प्रधान यांनी स्पष्ट केले.
पुणे हे बौद्धिक संपदेची ऊर्जा असलेले शहर आहे. जनतेचा सहभाग, जनजागृती आणि प्रत्यक्ष कृती या त्रिसूत्रीच्या आधारे ‘स्वच्छ भारत’ हे उद्दिष्ट गाठणे शक्य होणार आहे, असे सांगून माशेलकर म्हणाले, की पुण्यामध्ये गॅसबाबत वेगवेगळे प्रयोग सुरू असल्याने या क्षेत्रातही पुण्याची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे.
‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने’अंतर्गत सीएनजी ऑटो रिक्षाचालक आणि पीएमपी बसचालकांना धर्मेद्र प्रधान यांच्या हस्ते विमा पॉलिसी भेट देण्यात आली. याअंतर्गत १८ ते ७० वयोगटांतील विमाधारकास दुर्दैवाने अपघाती मृत्यू आल्यास दोन लाख रुपयांचे किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळणार आहे.
ग्राहकांसाठीच्या नव्या योजनांचा शुभारंभ

  •  ऑनलाइन गॅस सिलिंडर नोंदणीबरोबरच आता ऑनलाइन पेमेंटची सुविधाही उपलब्ध.
  • कॅश ऑन डिलिव्हरीसाठी आता डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पैसे देण्याची सुविधा.
  •  ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची सुविधा नसलेल्या ग्राहकांसाठी मॉल किंवा सार्वजनिक ठिकाणी ‘किऑक्स’ बसविणार.