करोना विषाणुंमुळे मागील दोन महिन्यांपासून जगभरातील नागरिकांमध्ये एक दहशत निर्माण झाली आहे. या विषाणू विरोधातील लढ्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस अधिकारी, कर्मचारी, विविध संघटना योगदान देत आहे. यांच्यापैकीच एक असणारे रेल्वेमध्ये कार्यरत असलेले आरपीएफ सहायक उपनिरीक्षक साजिद आणि त्यांच्या पत्नी पोलीस कर्मचारी शकीला शेख हे दोघेजण आपले कर्तव्य बजावून, दरररोज 150 ‘फेस शिल्ड मास्क’ची निर्मिती करत आहेत. यामुळे रेल्वे विभागाकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

या अनोख्या फेस शिल्ड मास्कबाबत आरपीएफ सहायक उपनिरीक्षक साजिद शेख यांच्याशी संवाद साधला ते म्हणाले, करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासन मोठ्या प्रमाणावर काम करीत आहे. त्यामध्ये आमच्या विभागातील काही जणांना मास्क तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. तर माझी पत्नी शकीला ही देखील रेल्वे सेवेत पोलीस कर्मचारी म्हणून काम करीत आहे. आम्हाला सांगितलेल्या दिवसांपासून इतरांप्रमाणे आम्ही दोघे साधारण मास्क तयार करीत होतो. तर प्रशासनाकडून ड्युटीवर काम करतेवेळी आम्हाला मास्क, प्लास्टिकचे फेस शिल्ड देण्यात आले होते. मास्क आणि त्यावर प्लास्टिकचे फेस शिल्ड असल्याने काम करतेवेळी खूप त्रास होत होता. या त्रासाबद्दल पत्नीबरोबर चर्चा केली. त्यानंतर आम्ही  साधारण मास्कवर डोळ्याच्यावरील बाजू पर्यंत जाईल असे प्लास्टिकचे कव्हर बसवले. अशा अनोख्या पद्धतीचे प्लास्टिकचे फेस शिल्ड मास्क अखेर तयार करण्यात आले. या मास्कचा काम करतेवेळी कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही.

हे नवे फेस शिल्ड मास्क वरिष्ठांना दाखविल्यानंतर या मास्कचे कौतुक करीत, यापुढील काळात असेच मास्क तयार करण्यास त्यांनी सांगितले. त्यानुसार आता आम्ही दोघेही जण दररोज कामावरून आल्यावर 150 पेक्षा अधिक अशा प्रकारचे मास्क तयार करतो. करोना विरोधातील लढ्यासाठी आम्हाला वरिष्ठांनी हे काम करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही आभारी असल्याचे त्यांनी सांगितले.

…अशी झाली आमच्या कामाला सुरूवात : शकीला शेख

या कामाबद्दल माहिती देताना शकीला शेख म्हणाल्या, सध्या करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, प्रशासनाकडून विशेष उपाय योजना करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवरच आम्हाला मास्क तयार करण्याची जबाबदारी दिली गेली होती. मात्र आमच्याकडे शिलाई मशीन नसल्याने आता काम कसे करायचे? असा सुरूवातीस आम्हाला प्रश्न पडला होता. शिवाय, लॉकडाउनमुळे मार्केट देखील बंद असल्याने नवीन मशीन घेणेही शक्य नव्हते. अशावेळी सोसायटीमधील नागरिकांनी आम्हाला दोन मशीन दिल्याने अखेर आमच्या कामास सुरुवात झाली.

आजपर्यंत आम्ही कधीही अशा प्रकारचे काम केले नव्हते. त्यामुळे आमच्यासमोर हे एक आव्हानच होते. मग आम्ही आमच्या जवळ असलेले मास्क पाहून, नवीन मास्क तयार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आम्हाला अडचणी आल्या, पण कोणत्याही चांगल्या कामाला अडचणी येणार असे समजून काम सुरूच ठेवले. आम्ही साधारणच मास्क तयार करीत होतो. परंतू माझे पती साजिद यांना ते कर्तव्यावर असताना त्यांचे मास्क आणि त्यावरील प्लास्टिकच्या फेस शिल्डमुळे अडचणी येत असल्यची बाब आमच्या लक्षात आली. हे अडचण लक्षात घेऊन त्यावर उपाय म्हणून प्लास्टिकचा वापर तर झाला पाहिजे परंतु त्रासही होता कामा नये, या दृष्टीने आम्ही मास्क निर्मितीवेळी विविध प्रयोग केले, अखेर हे नवे फेस शिल्ड मास्क तयार झाले. अशा प्रकाराचे मास्क तयार करताना आम्हाला एक वेगळा अनुभव आला असल्याचेही शकीला शेख यांनी सांगितले.

या अनोख्या मास्कचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे. हे पाहून खूप आनंद होत आहे. आता यापुढील काळात देखील आम्ही आधिकधिक मास्क तयार करणार आहोत. संपूर्ण प्रशासन करोनाच्या विरोधात लढा देत आहे. हे लक्षात घेऊन नागरिकांनी घरी बसून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.