स्वदेशी बनावटीच्या हेलिकॉप्टरची निर्मिती

लहानपणापासून हेलिकॉप्टरचे आकर्षण असलेल्या गॅरेजचालक तरुणाने स्वकष्टातून स्वदेशी बनावटीचे हेलिकॉप्टर तयार केले आहे. सातत्याने प्रयत्न सुरू ठेवल्याने सातव्या प्रयत्नात या प्रयोगाला यश आले. त्यासाठी त्याला ४० लाख खर्च आला असून त्याच्या या कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे.

प्रदीप शिवाजी मोहिते असे या गॅरेज चालकाचे नाव आहे. ते मूळचे सांगलीतील वांगी (केडगाव) भागातील रहिवासी आहेत. सध्या ते देहूगावात वास्तव्याला असून तळवडे येथे सिद्धनाथ नावाचे त्यांचे स्वत:चे गॅरेज आहे. प्रदीप यांना लहानपणापासून हेलिकॉप्टरचे आकर्षण होते. कागदाचे तसेच लाकडी हेलिकॉप्टर तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी यापूर्वी अनेकदा केला होता. शाळेत मन फार रमले नाही म्हणून त्यांनी जेमतेम दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि नंतर शाळा सोडून दिली. आई-वडिलांनी त्यांना गॅरेजमध्ये कामासाठी पाठवले. साडेचार वर्षे त्यांनी दुसऱ्या एका गॅरेजमध्ये काम केले. त्या अनुभवाच्या जोरावर नंतर स्वत:चे गॅरेज सुरू केले.

स्वदेशी बनावटीचे हेलिकॉप्टर तयार करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात कायम होता. मात्र, कामाच्या व्यापामुळे त्याचा विसर पडला. आमिर खानचा थ्री इडियट चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा तो पाहिल्यानंतर प्रदीप यांच्या स्वप्नांनी पुन्हा उभारी घेतली. पुन्हा प्रयत्न सुरू झाले. चारचाकी गाडीच्या इंजिनसह इतर आवश्यक गोष्टी बसवल्यानंतर तयार झालेले हेलिकॉप्टर उडण्याची शक्यता दिसू लागली. हेलिकॉप्टर हवेत उचलले जात होते. सुरुवातीच्या प्रयत्नात तीन वेळा हेलिकॉप्टर कोसळले. मात्र, त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले आणि त्यांना यश आले.

सहा मॉडेल केली, त्यात त्रुटी आढळून आल्या. अखेर सातव्या प्रयत्नात यश आले. आता हे हेलिकॉप्टर उडू शकते, असा अहवाल या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. लष्करासाठी लढाऊ हेलिकॉप्टर तयार करण्याचा प्रदीप यांचा मानस आहे. सरकारने मदत केल्यास हे स्वप्न साकार होऊ शकते.

– प्रदीप मोहिते