बालवयात प्रत्येकालाच बाहुलीचे आकर्षण असते. ‘छान माझी बाहुली गं, छोटी तिची सावली गं’ असे म्हणत सजविलेल्या बाहुलीचे लग्न हा तर उन्हाळ्याच्या सुट्टीतील आवडता खेळ असतो. आता देखील वेगवेगळ्या बाहुल्या भेटायला येणार आहेत. पण, या बाहुल्या आहेत जपानी. ‘ये गुडिया जपानी दिवानी लगती है’ या गीताची प्रचिती देणाऱ्या आणि ‘क्रिएटिव्ह हँड्स’ने घडविलेल्या जपानी बाहुल्या पाहण्याची संधी पुणेकरांना सोमवारपासून (१९ मे) मिळणार आहे.
जयंत साठे यांचे जपानी आणि भारतीय संस्कृती, सौंदर्य आणि कलेचा आविष्कार घडविणारे बाहुल्यांचे प्रदर्शन १९ ते २१ मे या कालावधीत बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात येत आहे. दररोज सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे. अशा बाहुल्या बनविण्याचा छंद जयंत साठे यांनी वयाच्या ५८ व्या वर्षीपासून सुरू केला. मुंबईमध्ये चिनी बनावटीच्या बाहुल्या पाहिल्यानंतर त्यापासून प्रेरणा घेत हा छंद जोपासला. त्यातील बारकावे समजून घेत नव्याने घडविलेल्या जपानी बाहुल्यांचे हे प्रदर्शन भरवित असल्याचे साठे यांनी सांगितले.
या प्रदर्शनामध्ये नेहमीच्या दहा इंची बाहुलीच्या जोडीने काही नावीन्यपूर्ण बाहुल्या पाहण्यास मिळणार आहेत. यामध्ये १८ इंच म्हणजे दीड फूट उंचीची जपानी बाहुली, कोटो हे जपानी वाद्य वाजविणारी मुलगी, हातात हात घालून उभ्या असलेल्या मायलेकी अशा वैशिष्टय़पूर्ण जपानी बाहुल्यांचा समावेश आहे. पारंपरिक मराठमोळा वेश परिधान केलेले वधू-वर, मावळा आणि ग्रेट शोमन राज कपूर यांची बाहुली, साहसी खेळांमध्ये अग्रेसर असलेल्या ‘पॅराट्रुपर’, हवाई सैनिकाची बाहुली अशा बाहुल्या या प्रदर्शनामध्ये पाहावयास मिळतील.