पुणे : भोवतालच्या विपरीत परिस्थितीवर मात करत माणसामधील सृजनशक्ती अबाधित आहे. त्यामुळे प्रतिकूलता असली तरी सृजनाची चैत्रपालवी फुटतेच, असे मत माजी संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.

‘संवादसेतू’आयोजित वासंतिक कथा विशेषांकाचे प्रकाशन डॉ. ढेरे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी त्या बोलत होत्या. कथास्पर्धेतील विजेत्यांना ढेरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ‘संवादसेतू’च्या संपादक डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी या वेळी उपस्थित होत्या.

ढेरे म्हणाल्या,‘ मराठी साहित्य क्षेत्रात कथालेखनाची समृद्ध परंपरा आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने नव्या पिढीतल्या लेखकांना नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. ‘आपण लिहू शकतो का?’ हे आजमावण्याची ही संधी होती. या कथांच्या माध्यमातून साचेबद्धता मोडून, कथापरंपरा पुढे नेण्यासाठीचा आस्थापूर्ण प्रयत्न आयोजकांनी केला आहे.’

कथा स्पर्धेचा निकाल

दि. बा. मोकाशी पारितोषिक – जांभूळकाळी, स्वप्नील चव्हाण (कल्याण)

जी. ए. कुलकर्णी पारितोषिक – किडा, सौरभ शामराज (बार्शी)

गंगाधर गाडगीळ पारितोषिक – निराश पुरुषाच्या दिनचर्येचे काही तुकडे, अरुण तीनगोटे (औरंगाबाद)

विद्याधर पुंडलिक पारितोषिक – गेले द्यायचे राहून, मिहिर ठक्कर (पुणे)

गौरी देशपांडे पारितोषिक – रानी की बाव, जयश्री जंगले (ठाणे).