माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचे विस्तारत चाललेले अवकाश त्याचप्रमाणे शिक्षण व रोजगाराच्या चांगल्या संध उपलब्ध होत असल्याने राज्य तसेच देशभरातून पुण्यात राहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यातूनच शहर व उपनगरांच्या परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. या इमारती उभारणारे बांधकाम व्यावसायिक हा एकच घटक त्यातून समोर येतो. पण, प्रत्यक्ष इमारतीची प्रत्येक वीट हाताने बसविणारा गवंडी किंवा इतर मजूर दुर्लक्षित राहतात..
..याच घटकातील व्यावसायिक कौशल्य वाढविण्याच्या दृष्टीने ‘कुशल क्रेडाई’ उपक्रम राबविण्यात येत असून, त्यातून प्रशिक्षित झालेल्या बांधकाम कामगारांची पुण्यात राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यात यश मिळालेल्या कामगारांना थेट ब्राझील येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
बांधकामावरील कामगारांना परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ व बांधकाम व्यावसायिकांच्या ‘क्रेडाई’ संस्थेच्या माध्यमातून ‘कुशल क्रेडाई’ हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंत सुमारे सोळा हजार बांधकाम कामगारांना ‘कुशल’च्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले आहे. मजुरांना ते काम करीत असलेल्या गृहप्रकल्पातच हे प्रशिक्षण दिले जाते. १३५ गृहप्रकल्पांवर हा उपक्रम राबविण्यात आला असून, त्यातील ७३ गृहप्रकल्प पुण्यातील आहेत. महाराष्ट्राबरोबरच गोवा व चेन्नई येथेही हा उपक्रम राबविला जातो.
कुशल क्रेडाई उपक्रम व स्पर्धेबाबत कुशल क्रेडाईचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे, क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष रोहीत गेरा, कुशल क्रेडाईचे सदस्य कपील त्रिमल यांनी माहिती दिली. प्रशिक्षण दिलेल्या बांधकाम कामगारांसाठी औंध येथील द स्पायर या गृहप्रकल्पाच्या ठिकाणी ७ ते ८ ऑक्टोबरला राष्ट्रीय कौशल्य विकास स्पर्धा होणार आहे. स्पर्धेच्या परीक्षणासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्याला ब्राझील येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होता येणार आहे, असे श्रॉफ यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारत यंदा प्रथमच कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड बिल्डिंग टेक्नॉलॉजी आणि वॉल अ‍ॅण्ड फ्लोअर टायिलग या दोन प्रकारात सहभाग घेणार आहे. यापूर्वी भारताने २०११ व २०१३ मधील स्पर्धेत सहभाग घेतला होता.

बांधकाम कामगारांना केवळ व्यावसायिक प्रशिक्षणच नव्हे, तर त्यांचे आरोग्य, बचत व त्यांच्या मुलांसाठी शिक्षण यावरही ‘कुशल’कडून काम करण्यात येत आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणांचे सहाय्यही मिळते आहे. परिपूर्ण कौशल्य प्राप्त केलेल्या कामगारांच्या रोजंदारीतही वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांचे रहाणीमानही उंचावण्यास मदत झाली आहे.
– रोहीत गेरा, उपाध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो