पोलीस कंट्रोल रूमला मुंबईहून आलेल्या दूरध्वनीची तातडीने दखल घेतल्यामुळे लठ्ठपणाच्या व्याधीने निधन झालेल्या व्यक्तीचे तब्बल चार तास अंत्यसंस्कार रोखले गेले. इस्टेटीच्या वादातून बहिणीने केलेली तक्रार आणि पतीवर लवकरात लवकर अंत्यसंस्कार व्हावेत, यासाठी दुख बाजूला ठेवत गयावया करणारी पत्नी अशी हृदयद्रावक घटना गुरुवारी घडली.
कोथरूडच्या महात्मा सोसायटी येथे वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीचे लठ्ठपणाच्या व्याधीने सकाळी निधन झाले. त्यापूर्वीच दोन दिवस रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्यामुळे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी डेथ सर्टिफिकेट दिले. या निधनाचे वृत्त समजताच मुंबई येथे उच्चपदावर काम करणाऱ्या या व्यक्तीच्या बहिणीने पोलीस कंट्रोल रूमला दूरध्वनी करून हे अंत्यसंस्कार होऊ नयेत अशी मागणी वकिलामार्फत केली. त्याचप्रमाणे भावाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन व्हावे अशीही या बहिणीने मागणी केली. त्याची तातडीने दखल घेऊन कोथरूड पोलिसांनी वैकुंठ स्मशानभूमी गाठली. या दांपत्याला अपत्य नसल्यामुळे पत्नीनेच अंत्यविधी केले आणि पार्थिव विद्युतदाहिनीमध्ये नेण्याची वेळ आली, तेव्हा पोलिसांनी त्यास मज्जाव केला. वैकुंठ स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी आरोग्यप्रमुखांशी संपर्क साधला. पोलिसांच्या आदेशानुसार कार्यवाही केला जावी, असे आरोग्यप्रमुखांनी या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
स्मशानभूमीतील एक विद्युतदाहिनी दुरुस्तीसाठी बंद असल्यामुळे त्याचवेळी अंत्यसंस्कारासाठी आलेल्या पार्थिवाचे विधी दुसऱ्याजागी करावे लागले. अतिवजनामुळे निधन झालेल्या या मृतदेहाचे वजन वाढू लागले. आपल्या पतीचे पार्थिव शवविच्छेदनासाठी नेल्यास आत्महत्या करू असे या महिलेने सांगितले. त्यामुळे पोलिसांची पंचाईत झाली. शेवटी रुग्णालयात जाऊन या डेथ सर्टिफिकेटवर मृत्यूच्या कारणाची नोंद करून घेण्यात आली. रात्री आठच्या सुमारास या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर या व्यक्तीची बहीण वैकुंठामध्ये आली. तिने अंत्यसंस्कार का केले अशी विचारणा कर्मचाऱ्यांकडे केली. पोलिसांनी परवानगी दिल्यानंतरच अंत्यसंस्कार झाले असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर स्मशान परवाना क्रमांक आणि अन्य बाबींची नोंद घेतल्यावरच ही बहीण स्मशानभूमीतून बाहेर पडली.