चिन्मय पाटणकर

भारतीय क्रिकेटपटूंची छायाचित्रे, साहित्य, रंजक माहिती

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा ज्वर आता चढू लागला आहे. अशातच नऱ्हे येथे खास क्रिकेटप्रेमींसाठी ‘क्रिककॅफे’ साकारला आहे. क्रिकेटला वाहिलेला हा अनोखा ‘थिम कॅफे’ असून या कॅफेमध्ये खाद्यपदार्थासह भारतीय क्रिकेटपटूंची छायाचित्रे, साहित्य, रंजक माहिती असे वातावरण आहे.

क्रिकेटवेडय़ा तुषार जाधव आणि महेश हांडे यांनी हा कॅफे सुरू केला आहे. तुषारने व्यवस्थापनातील ऑपरेशन्स या विषयातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे, तर महेश अंतर्गत सजावटकार (इंटेरिअर डिझायनर) आहे. विशेष म्हणजे दोघांचीही हॉटेल क्षेत्राची पाश्र्वभूमी नाही. मात्र, क्रिकेट आणि हॉटेल क्षेत्राविषयीच्या उत्सुकतेतून या दोन्हीची सांगड घालत त्यांनी दोन वर्षे नियोजन करून हा ‘थिम कॅफे’ साकारला. या कॅफेमध्ये भारतीय क्रिकेटला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. ‘जगभरात फुटबॉल, हॉलिवूड, बॉलिवूड, सुपरहिरो अशा संकल्पनांवरची हॉटेल्स आहेत. मग खास क्रिकेटचे हॉटेल का नको, या विचारातून आम्ही कॅफे सुरू करायचा निर्णय घेतला. आमच्याकडे स्वतची जागा असली, तरी वेगळे काहीतरी करायचा विचार होता, असे तुषार याने सांगितले.

विशेष काय?

* कॅप्टन्स वॉल – भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारांची छायाचित्रे

* विश्वचषक, चॅम्पियन्स करंडक, टी ट्वेंटी विश्वचषकाची प्रतिकृती

* क्रिकेटची बॅट, चेंडू आणि अन्य साहित्याची मांडणी

* बाहेरून पॅव्हेलियनसारखी रचना

* क्रिकेटपटूंच्या सह्य़ा असलेल्या बॅट

* विश्वचषक विजेत्या भारतीय संघाची छायाचित्रे

* भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीत झालेले बदल

विस्तार करणार

क्रिककॅफे हा ब्रँड नोंदणीकृत करण्यात आला आहे. येत्या काळात शहरातील अन्य उपनगरांमध्ये विस्तार करण्याचीही योजना आहे. काही शाखा सुरू करण्यात येतील. कॅफेला आणखी आकर्षक करण्यासाठी काही कल्पना आहेत. त्या पुढील काळात प्रत्यक्षात येतील , असेही तुषार म्हणाला.