वानवडीतील एका मॉलमध्ये बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने रविवारी रात्री छापा टाकला. या कारवाईत सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गौरव रणजीत सिंग (वय ३१, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी गांव), दिलीप शंकरलाल भंडारी (वय ५०, रा. केपीसीटी मॉल), वेंकटेश वेंकय्या अटला (वय  ३२, रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी गांव), जितेंद्र रामप्रकाश राठोड (वय २६), करण मनोहरसिंग नेगी (वय २६) आणि डेव्हिड रमेश विल्सन (वय २४) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एम. मुजावर यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. दिलीप भंडारी हा वानवडीतील शिवरकर रस्त्यावरील केपीसीटी मॉलमध्ये बेकायदेशीररीत्या पलाझो नावाने हुक्का पार्लर चालवित होता, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.
तेथे रविवारी रात्री छापा टाकण्यात आला. त्यावेळी आरोपी हुक्का ओढत होते. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. हुक्का पार्लरचा मालक भंडारी याने बाहेर खासगी अंगरक्षक तैनात केले होते. अनोळखी व्यक्तींना तेथे प्रवेश दिला जात नव्हता. या कारवाईत हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुजावर, सहायक निरीक्षक संपत पवार, गणेश जगताप, शशीकांत शिंदे, राजेश उंबरे, रमेश लोहकरे, नितीन तेलंगे,  नितीन लोंढे, संदीप होळकर यांनी ही कारवाई केली.
रास्ता पेठेतील जुगारअड्डय़ावर छापा
तेराजणांना अटक
रास्ता पेठेतील एका इमारतीतील सदनिकेत सुरू असलेल्या जुगारअड्डय़ावर पोलिसांनी छापा टाकून शिवसेनेच्या शाखाप्रमुखासह तेराजणांना अटक केली. पोलिसांनी तेथून एक लाख १२ हजार रुपये आणि जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले.
हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील यांनी समर्थ पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. शिवसेनेचा शाखाप्रमुख मयूर सुधाकर झेंडे (वय ३२), त्याचा भाऊ श्रीकांत (वय ३५), भारत मोतीराम जैन (वय ४५), दीपक बाळासाहेब पिसाळ (वय ५४, सर्व रा. रास्ता पेठ), सुनील राजकुमार शेटीया (वय ४८रा. भवानी पेठ), संतोष लक्ष्मण येनपुरे (वय ३५, रा. शुक्रवार पेठ), गणेश सुरेश शिवशरण (वय २५, रा. दांडेकर पूल), माणिक तिलकचंद जैन (वय ४५, रा. शुक्रवार पेठ), जितेंद्र आनंदराज (रा. धनकवडी), प्रमोद गंगाधर नांगरे (वय ४३, रा.उत्तमनगर), हनुमंत जयराज राठोड (वय २३, रा. धनकवडी) यांच्यासह तेराजणांना अटक करण्यात आली. मयूर झेंडे हा शिवसेनेच्या नगरसेविका सोनम झेंडे यांचा पती आहे तसेच तो शिवसेनेचा शाखाप्रमुख आहे.
रास्ता पेठेत पिसाळ याच्या सदनिकेत जुगारअड्डा झेंडे चालवित असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार हडपसर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक दिनेश पाटील, राहुल कोलंबीकर आणि त्यांच्या पथकाने सोमवारी दुपारी छापा टाकला.