जमिनीच्या वादातून बाणेर येथील एका व्यक्तीला मारहाण केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबुराव चांदेरे, त्यांची दोन मुले आणि इतर चार ते पाच जणांविरुद्ध चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्राणेश ज्ञानेश्वर सायकर (वय २७, रा. बाणेर म्हाळुंगे रस्ता, बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून चांदेरे यांच्यासह त्यांचा मुलगा किरण चांदेरे, समीर चांदेरे यांच्यासह चार ते पाच व्यक्तींवर मारहाण, सार्वजनिक ठिकाणी दंगा करणे, धमकी देणे या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथे सायकर यांची जमीन आहे. त्यांच्या नातेवाइकांनी त्यांच्या हिश्श्याची जमीन चांदेरे यांना विकली आहे. या जमिनीवर चांदेरे व सायकर यांच्यात वाद सुरू आहेत. या जमिनीची मोजणी करण्यासाठी भगवान सायकर यांनी अर्ज केला होता. जमिनीची मोजणी करण्यासाठी शुक्रवारी सकाळी काही अधिकारी आले. या जमीन मोजणीला सायकर यांनी हरकत घेतली. त्या वेळी अधिकाऱ्यांनी फक्त पंचनामा करतो म्हणून त्यांना सांगितले. मात्र, त्यानंतर चांदेरे यांनी सायकर यांना ‘माझी अडवणूक करतो का, तुला लय माज आलाय’ असे म्हणत फोन करून त्यांच्या दोन मुलांसह इतरांना बोलवून घेतले.
सायकर व त्यांचे चुलते या वेळी घरी निघून गेले होते. चांदेरे व त्यांच्या दोन मुलांनी आणि इतर काही जणांनी सायकर यांच्या घरात घुसून त्यांना लाथा बुक्क्य़ांनी मारहाण केली. त्या वेळी त्यांची पत्नी, चुलती व अन्य नातेवाईक भांडण सोडवण्यासाठी आले असता या सर्वानी त्यांना ढकलून दिले. तर, सायकर यांचे मेव्हणे प्रवीण शिंदे यांना काठीने मारहाण केली. जाताना त्यांनी घराची तोडफोड करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे सायकर यांनी फिर्यादीमध्ये म्हटले आहे. सायकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलीस पुढील तपास करत आहेत.