तीन वर्षांच्या मुलीच्या खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या, मात्र आता जामिनावर बाहेर असलेल्या सराईत गुन्हेगाराला ब्राऊन शुगरची विक्री करताना पोलिसांनी अटक केली आहे. खुनाच्या गुन्ह्य़ात उच्च न्यायालयाने त्याला जामीन दिल्यामुळे अटक केलेला आरोपी बाहेर होता.
महादेव किंचक मिसाळ (रा. लोहियानगर) असे अटक केलेल्यांचे नाव आहे. खडक पोलीस ठाण्याचे कर्मचारी अमोल पवार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली, की एक सराईत गुन्हेगार ब्राऊन शुगरची विक्री करीत आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या पथकाने गंज पेठेतील लोहियानगर येथे मिसाळ याला अटक केली. त्यांच्याकडून साडेआठ ग्रॅम वजनाच्या ११२ पुडय़ा जप्त केल्या. मिसाळ याने मे २००४ रोजी ब्राऊन शुगरच्या नशेत असताना त्याने ठेवलेल्या महिलेच्या तीन वर्षांच्या मुलीचा खून केला होता. या गुन्ह्य़ात त्याला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील केल्यानंतर न्यायालयाने त्याला मे २०११ मध्ये जामीन मंजूर केला आहे. त्याला ब्राऊन शुगरची विक्री करताना अटक केली आहे. या प्रकरणी मिसाळ याला न्यायालयात हजर केले असता २२ मे पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश दिला.