गुन्हे शाखेची कारवाई; गुजरातमधील व्यापारी अटकेत

पुणे : बनावट सौंदर्यप्रसाधनांसह घरगुती वापराच्या  वस्तूंची निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्याच्या कोंढव्यातील गोदामावर गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईत बनावट सौंदर्यप्रसाधने तसेच दैनंदिन वापरातील वस्तू असा १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  या प्रकरणी एका व्यापाऱ्याला अटक करण्यात आली असून तो मूळचा गुजरातचा आहे.

हितेश राघवजी रावरिया (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी रामजी महादेव पटेल (वय ४२, रा. लेकटाऊन सोसायटी, बिबवेवाडी) यांच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कोढवा भागातील गोकुळनगर परिसरात भाविका बायोकेम नावाच्या गोदामात बनावट सौंदर्यप्रसाधने तसेच दैनंदिन वापरातील वस्तूंचा साठा करून ठेवला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पोलीस हवालदार संतोष क्षीरसागर आणि अतुल साठे यांना मिळाली.

रावरिया, पटेल यांनी दोन वर्षांपूर्वी गोकुळनगर भागातील गोदाम भाडेतत्त्वावर घेतले होते. तेथून ते बनावट सौंदर्यप्रसाधने तसेच अन्य वस्तू बाजारात वितरित करत होते. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकल्यानंतर सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती करणाऱ्या विविध नामवंत कंपन्यांची उत्पादने जप्त करण्यात आली.  सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. कंपनीतील अधिकाऱ्यांनी बनावट उत्पादने असल्याचे स्पष्ट केले. रावरिया आणि पटेल मूळचे गुजरातमधील कच्छ भागात असलेल्या मेघपरचे आहेत. रावरियाला लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील अ‍ॅड. ज्योती वाघमारे-बऱ्होळीकर यांनी त्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. न्यायालयाने त्याला ३० सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह, सहय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र मोकाशी, भालचंद्र ढवळे, संजय गायकवाड, दत्तात्रय गरुड, प्रवीण तापकीर, संदीप तळेकर, शकील शेख यांनी ही कारवाई केली.