उत्तमनगर पोलिसांची कारवाई

खाऊच्या आमिषाने अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्या एकाला उत्तमनगर पोलिसांनी अटक केली. मंगळवारी (२६ जुलै) रात्री ही घटना घडली.

उमेश विष्णू जाधव (वय २७, सध्या रा. उत्तमनगर, मूळ रा. कुर्डुवाडी, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाची आई बांधकाम मजूर आहे. आरोपी जाधव हा काही दिवसांपूर्वी एका गृहप्रकल्पाच्या बांधकामावर मजूर म्हणून कामाला आला. त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. मंगळवारी सायंकाळी जाधव याने मुलाला खाऊ देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने मुलावर अत्याचार केले. घाबरलेल्या मुलाने या प्रकाराची माहिती त्याच्या आईला दिली. तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त तुकाराम गौड, पोलीस निरीक्षक विजय कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी तातडीने पसार झालेला आरोपी जाधव याला पकडण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी जाधव याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरोडय़ाच्या तयारीतील चोरटय़ांची टोळी जेरबंद

बाह्य़वळण मार्गावर पोलिसांची कारवाई

मुंबई-बंगळुरू बाह्य़वळण मार्गावर एका दुकानातील रोकड लुटण्याच्या तयारीत असलेल्या चोरटय़ांच्या टोळीला सिंहगड पोलिसांनी जेरबंद केले. चोरटय़ांकडून देशी बनावटीचे पिस्तूल, कोयते, मोटार असा माल जप्त करण्यात आला.

प्रदीप ऊर्फ गणेश बाळासाहेब गाडे (वय २६, रा. माढा, जि. सोलापूर), प्रसाद ऊर्फ राजू गणेश भोरपकर (वय २१, रा. धायरी), गणेश मच्छिंद्र कांबळे (वय २१, रा. माणिकबाग, सिंहगड रस्ता), राजू ऊर्फ दादा रामदास लोंढे (वय ३०, रा. धायरी), स्वप्नील तानाजी मारणे (वय २४, रा. धायरी) अशी अटक करण्यात आलेल्या चोरटय़ांची नावे आहेत. सहायक पोलीस निरीक्षक यशवंत ओंबासे यांनी या संदर्भात सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गाडे, भोरपकर, कांबळे, लोंढे, मारणे सराईत आहेत. बाह्य़वळण मार्गावर नऱ्हे येथील एका मद्यविक्रीच्या दुकानात जमा झालेली रोकड लुटण्यासाठी ते मोटारीतून येणार असल्याची माहिती सोमवारी रात्री दहाच्या सुमारास मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा रचला आणि आरोपींना पकडले. आरोपींकडून देशी बनावटीचे पिस्तूल, मोटार, कोयते, मिरची पूड असा माल जप्त करण्यात आला.

पिंपरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुधविक्रेत्यांना लुबाडले

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चोरटय़ांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघा दुधविक्रेत्यांना लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरटय़ांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रकाश गोपालदास सबनानी (वय ५८, रा. पिंपरी) यांनी यासंदर्भात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील गेलार्ड चौकात सबनानी दुधविक्री करतात. मंगळवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी सबनानी यांच्याकडे पत्ता विचारण्याच्या बहाणा केला. त्यानंतर सबनानी यांना मारहाण करून चोरटय़ांनी त्यांच्याकडिल मोबाईल हिसकावून नेला. पिंपरी भागात हेमु कलानी उद्यानाजवळ दुधविक्री करणारे रामआसरे शिवपाल पाल (वय ६५) यांनाही मारहाण करून चोरटय़ांनी त्यांच्याकडील साडेसात हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली. सहायक पोलीस निरीक्षक डी.पी.सूर्यवंशी तपास करत आहेत.