डेक्कन, एरंडवणे भागात धुमाकूळ घालून एकापाठोपाठ एक सदनिकांचे कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरटय़ांच्या टोळीला पोलिसांनी पकडले. चोरटय़ांकडून घरफोडीचे ४० गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून १८ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सर्फराज उर्फ शेरू बाबुमियाँ शेख (वय २८, रा.कागदीपुरा, कसबा पेठ), अनिस हमीद शेख (वय २५, रा.खडकी) आणि नासीर हमीद शेख (वय २५, रा. खडकी) अशी अटक करण्यात आलेल्या चोरटय़ांची नावे आहेत, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. दोन महिन्यांपूर्वी डेक्कन व एरंडवणे परिसरात एका रात्रीत वेगवेगळ्या सोसायटय़ांमधील १६ सदनिकांचा दरवाजा तोडून चोरटय़ांनी ऐवज लांबविला होता. या गुन्हय़ाचा डेक्कन पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. आरोपी शेरू याच्यावर यापूर्वी घरफोडीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. या गुन्हय़ात त्याला शिक्षाही झाली होती. शिक्षा भोगून तो येरवडा कारागृहातून काही महिन्यांपूर्वी बाहेर पडला होता. त्यानंतर त्याने पुन्हा घरफोडीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली होती. शेरू, त्याचे साथीदार अनिस, नासीर यांनी एरंडवणे भागात घरफोडी केल्याची माहिती डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुषमा चव्हाण यांना मिळाली होती.

पोलिसांच्या पथकाने त्यांचा माग काढण्यास सुरुवात केली होती. शेरू आणि त्याचा साथीदार नासीर दुचाकीवरून प्रभात रस्ता परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. तेथे सापळा रचून पोलिसांनी त्यांना अटक  केली. दरम्यान शेरूला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने पोलिसांची नजर चुकवून स्वत:वर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. तिघा आरोपींकडून १६ लाख ३६ हजारांचे सोन्याचे दागिने, एक चोरलेली दुचाकी, कटावणी असा माल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुषमा चव्हाण, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुचेता खोकले, उपनिरीक्षक राहुल कोलंबीकर, संतोष जगताप, बशीर सय्यद, राजकिरण पवार, संजय शिंदे, सुभाष जाधव, संजय पायगुडे यांनी ही कारवाई केली.

चोरीसाठी रिक्षाचा वापर

आरोपी नासीर याने चोरीच्या पैशांमधून रिक्षा विकत घेतली होती. रिक्षातून ते शहराच्या वेगवेगळ्या भागांत फिरायचे. सोसायटय़ांधील बंद सदनिकांची टेहळणी करून शेरू व अनिस सदनिकांचे कुलूप तोडायचे. तर नासीर सोसायटीच्या बाहेर रिक्षा घेऊन थांबायचा. चोरलेला मुद्देमाल रिक्षात घालून ते पसार व्हायचे. शेरू सन २००६ पासून घरफोडय़ा करत आहे. त्याच्यावर २४ गुन्हे दाखल आहेत. नासीरविरुद्ध घरफोडीचे २२ गुन्हे दाखल झाले आहेत.