सदाशिव पेठेतील घटना, ७५ हजारांची सोनसाखळी हिसकावली

प्रवाशाशी झालेल्या वादातून रिक्षाचालकाने प्रवाशाची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना सदाशिव पेठेत घडली.

या प्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नीलेश पुखराज जैन (वय ३४, रा. कात्रज) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन गुरुवारी (२५ ऑगस्ट) कामानिमित्त सदाशिव पेठेत आले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते रिक्षातून सदाशिव पेठेत उतरले. जास्त भाडे आकारल्याने त्यांनी रिक्षाचालकाकडे विचारणा केली. या कारणावरून रिक्षाचालकाशी त्यांच्याशी वाद झाला. दरम्यान, रिक्षाचालकाचे साथीदार तेथे जमा झाले. रिक्षाचालकाने मारहाण करून गळ्यातील ७५ हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली, असे जैन यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. बी. चाकोरे तपास करत आहेत.

वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करणारा दुचाकीस्वार अटकेत

वाहतूक शाखेतील सहायक फौजदाराला धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी  दुचाकीस्वार तरुणाला अटक करण्यात आली.

रोहित नंदकुमार पोतदार असे अटक करण्यात आलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. सहायक फौजदार चौधरी यांनी यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार पोतदार गुरुवारी (२५ ऑगस्ट) सकाळी फग्र्युसन रस्त्यावरील ज्ञानेश्वर पादुका चौकातून वाहतुकीच्या नियमांचा भंग करुन निघाला होता. त्या वेळी सहायक फौजदार चौधरी यांनी त्याला थांबण्याची सूचना केली. त्याला दंड भरण्यास सांगितले असता, पोतदारने वादावादी करुन चौधरी यांना धक्काबुक्की केली.

पुणे पीपल्स बँकेच्या मॉडेल कॉलनी शाखेत चोरीचा प्रयत्न

पुणे पीपल्स कॉ-ऑप बँकेच्या मॉडेल कॉलनी शाखेचा दरवाजा उचकटून चोरटय़ांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.

बँकेच्या शाखा व्यवस्थापक मंजूषा नितीन क्षीरसागर (वय ५०, रा. एरंडवणे) यांनी या संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पुणे पीपल्स कॉ-ऑप बँकेच्या मॉडेल कॉलनी शाखेचे कामकाज बंद झाले. त्यानंतर बँक बंद करण्यात आली. गुरुवारी (२५ ऑगस्ट) सकाळी बँकेचा दरवाजा सुरक्षारक्षकाने उघडला. त्या वेळी कुलपे तोडल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक देवधर तपास करत आहेत.