बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून एटीएम कार्डचा क्रमांक व इतर गोपनीय माहिती घेऊन ऑनलाइन बँकिंगद्वारे एकाला १ लाख १९ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे.

या प्रकरणी अशोक बागुल (३४) यांनी फिर्याद दिली असून रामदेव यादव याच्यावर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार बागुल यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते आहे. यादव याने बागुल यांना फोन करून बँकेतून बोलत असल्याचे सांगितले आणि त्यांच्याकडून एटीएम कार्ड क्रमांक व खात्याविषयीची माहिती घेतली. त्यानंतर त्याने खात्यातील १ लाख १९ हजार ९९६ रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेऊन फसवणूक केली.

दीडशे रिक्षा चालकमालक, पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे

पोलिस आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात जमावबंदी व मोर्चा काढण्यास प्रतिबंद असताना बेकायदेशीर जमाव जमवून आंदोलन व वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी रिक्षा चालक-मालक, आंदोलनात सहभागी विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्यावर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गणेश नाईकवाडे, नाना क्षीरसागर, बाबा कांबळे, आबा िशदे तसेच विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी व इतर १५० रिक्षा चालक-मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार परशुराम लांडगे यांनी फिर्याद दिली आहे.

वर्षभरापासून ओला-उबेर बंदची मागणी करणाऱ्या रिक्षा चालक-मालक, रिक्षा संघटनांचे पदाधिकारी आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पुणे पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात बंदी असताना रिक्षांचा संप पुकारून प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान रिक्षा चालकांनी कुलकॅबची तोडफोड केली. त्यात दोन लाख ५० हजारांचे नुकसान झाले असून आंदोलकांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

बेकायदा पिस्तूल दहा जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट चारने दोन ठिकाणी कारवाई करून दोघा सराइतांना अटक केली. अविनाश सोमनाथ कंधारे (२६, रा. किष्किंधानगर, कोथरूड), ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (२८, रा. तानाजीनगर, धनकवडी) अशी अटक आरोपींची नावे असून त्यांच्याकडून तीन पिस्तुले आणि दहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सराईत गुंड सागर रजपूत याच्याकडे केलेल्या तपासात अविनाश कंधारे याच्याकडे बेकायदा पिस्तुल असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कंधारे याला ताब्यात घेऊन त्याच्या घरातून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे असा एक लाख तीन हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. तसेच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून धर्मजिज्ञासू याला सापळा रचून अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली. अटक केलेले दोन्ही गुन्हेगार सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिस निरीक्षक लक्ष्मण बोराटे, मिलिंद गायकवाड आणि त्यांच्या पथकाने केली.

मध्यस्थाला मारहाणप्रकरणी चौघांना अटक

रामटेकडी परिसरातील  घटना

भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एकाला मारहाण करून लुटल्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली.

रामटेकडी परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी मसाजी शेडगे (३२) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार रितीक धर्मेद्र कागडा (वय १८), नारायण ग्यानी कागडा (वय ४४), इलु ऊर्फ धर्मेद्र ग्यानी कागडा (वय ३०) आणि एक महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, या घटनेत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यानुसार धर्मेद्र ग्यानी कागडा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मसाजी नामदेव शेडगे (वय ३२) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार शेडगे हे घरी जात असताना कागडा कुटुंबीय शंकर बल्लाळ यांना मारहाण करीत होते.

त्या वेळी शेडगे यांनी त्याबाबत विचारणा केली असता कागडा यांनी फिर्यादीला लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केली. तसेच त्याच्याजवळील रोख १८ हजार सातशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यांच्या दुचाकीचेही नुकसान केले, असे तक्रारीत म्हटले आहे.

दत्तवाडी पोलिसांविरोधातील फौजदारी खटला रद्द

तक्रार न घेता त्रास दिल्याबद्दल किरण शेख यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून दत्तवाडी पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालाविरोधात निर्णय देऊन सत्र न्यायालयाने दत्तवाडी पोलिसांविरोधातील फौजदारी खटला रद्द केला.

अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश डी.डी. देशमुख यांनी हा निर्णय दिला. किरण रशिद शेख यांचा मिळकतीचा वाद होता व त्या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी तक्रार घेतली नाही उलट त्रास दिला, असा आरोप करत किरण शेख यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांसह सहा पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. त्याची दखल घेऊन न्यायालयाने गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश ८ डिसेंबर २०१५ रोजी दिले होते. या निकालाविरोधात दत्तवाडी पोलिसांनी जिल्हा न्यायालयात अ‍ॅड. मििलद पवार, अ‍ॅड. योगेश पवार, गणेश सोनवणे यांच्यामार्फत फेरयाचिका दाखल केली होती.

प्रथमवर्ग न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आदेश पारित करताना तांत्रिक व चुकीच्या आरोपांवर व मुद्दय़ांवर निकाल दिला आहे. निकाल देताना नैसर्गिक न्याय तत्त्वाचा विचार झाला नाही, असा युक्तिवाद अ‍ॅड. पवार यांनी जिल्हा न्यायालयात केला. हा युक्तिवाद ग्राह्य़ धरून जिल्हा सत्र न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी प्रथमवर्ग न्यायादंडाधिकाऱ्यांनी दिलेला निकाल रद्द केला.

निगडीतील धन्वंतरी पतसंस्थेत चोरीचा प्रयत्न

निगडीतील धन्वंतरी पतसंस्थेचे लोखंडी शटर उचकटून चोरीचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आला आहे.

धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेचे निगडी शाखेचे व्यवस्थापक सचिन पगडे यांनी या संदर्भात निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निगडीतील प्राधिकरण भागात धन्वंतरी पतसंस्थेचे कार्यालय आहे. गेल्या गुरुवारी (२५ ऑगस्ट) मध्यरात्री चोरटय़ांनी पतसंस्थेचे लोखंडी शटर उचकटले. चोरटे पतसंस्थेचे कार्यालयात शिरले. कार्यालयीन साहित्य तसेच फर्निचरची मोडतोड करून पसार झाले. सहायक निरीक्षक पी. आय. अहिरे तपास करत आहेत.