सोळा वाहनांची तोडफोड; १२ मोटारी, टेम्पो, दुचाकींची तोडफोड

कर्वेनगर भागातील हिंगणे होम कॉलनीत पूर्ववैमनस्यातून सोमवारी पहाटे वाहनांची तोडफोड करण्यात आली. गुंडांनी केलेल्या तोडफोडीत बारा मोटारी, एका टेम्पोसह, तीन दुचाकी अशा सोळा वाहनांचे नुकसान झाले. तोडफोडीच्या घटनेमुळे हिंगणे होम कॉलनी परिसरातील रहिवासी भयभीत झाले. दरम्यान, सोमवारी दुपारी या प्रकरणी वारजे पोलिसांकडून दोघांना अटक करण्यात आली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात वाहनांच्या तोडफोडीच्या तसेच वाहने पेटवून देण्याच्या घटना सातत्याने घडत असून अद्याप या प्रकारांवर नियंत्रण आणता आलेले नाही.

हिंगणे होम कॉलनी भागात तरुणांच्या दोन गटात वाद झाले होते. वैमनस्यातून तोडफोड करण्यात आल्याची माहिती वारजे पोलिसांकडून देण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश महाडिक याचा विरोधी गटातील तरुणाबरोबर वाद झाला होता. पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास महाडिक, कोंढरे आणि त्यांचे साथीदार हिंगणे होम कॉलनी भागात आले. त्यांनी लोखंडी टिकावाच्या साहाय्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तोडफोडीच्या आवाजामुळे रहिवाशांना जाग आली. मात्र, गुंडांकडून करण्यात येत असलेल्या शिवीगाळीमुळे रहिवासी भयभीत झाले. टोळक्याने बारा मोटारी, एक टेम्पो आणि तीन दुचाकींची तोडफोड केली. तोडफोड करून टोळके पसार झाले.

महेश महाडिक (वय २५) आणि हर्षल कोंढरे (वय २४, दोघे रा. हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर) अशी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वारजे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर महाडिक आणि कोंढरे यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

वैमनस्यातून तोडफोड केल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे. महाडिक आणि कोंढरेच्या साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

टोळक्याची दहशत

घोरपडे पेठेतील एकबोटे कॉलनी भागात टोळक्याने रविवारी दुपारी दहशत निर्माण केली. टोळक्याने सिमेंटचे ठोकळे गायत्री अवताडे यांच्या घरावर फेकून मारले. या भागातील रहिवासी बशीर यांच्या मोटार, मनीषा बोई यांची दुचाकी तसेच आरिफ शेख यांच्या रिक्षाची तोडफोड केली. शेख यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास टोळके एकबोटे कॉलनी भागात आले. टोळक्यातील काही जणांकडे तीक्ष्ण शस्त्रे होती. टोळक्यातील तरुणांनी वसाहतीतील रहिवाशांना शिवीगाळ करून दहशत निर्माण केली.

घटना नित्याच्या

पुणे आणि लगतच्या पिंपरी-चिंचवड शहर परिसरात वाहनांच्या तोडफोडीच्या तसेच वाहने पेटवून देण्याच्या घटना नेहमी घडतात. पूर्ववैमनस्यातून बहुतांश घटनांत वाहनांची तोडफोड करण्यात येते. दबदबा निर्माण करण्यासाठी गुंडांकडून तोडफोड करण्यात येते. तोडफोडीच्या घटनांमध्ये सामान्यांच्या वाहनांने नुकसान होते.