काही तरी करायचे या जिद्दीने त्याने अंधत्वावर मात करून शिक्षण घेतले. त्याला नोकरी लागावी म्हणून वडिलांनीही ओळखीच्या व्यक्तीला नोकरी पाहण्यास सांगितले. त्या व्यक्तीने पोलीस आयुक्तालयात नोकरी लावण्यासाठी ७० हजार रुपये घेतले, पण नोकरी लावलीच नाही. फसवणुकीबद्दल गुन्हा दाखल झाला, खटलाही सुरू झाला. तारखांवर तारखा पडत राहिल्या. शेवटी तडजोड करून महालोकअदालतीमध्ये प्रकरण मिटविण्याचे ठरले. फसवणूक करणाऱ्याने दरमहा पैसे देण्याचे केले आणि खटला मिटविण्यात आला. पण, त्या व्यक्तिने ठरल्याप्रमाणे पैसे दिले नाहीत. त्यामुळे पुन्हा त्या तरुणाच्या पोलीस व न्यायालयाच्या फेऱ्या सुरू झाल्या.. नऊ वर्षांपासून तो न्यायासाठी धडपडत आहे.. पण, त्याच्या लढाईला अजून तरी यश आलेले नाही.
रूपकुमार राकेवल यादव (वय २६, रा. निरीक्षण विहार, खडकी) असे या तरुणाचे नाव. तो अंध आहे. त्याचे वडील शासकीय कंपनीत नोकरी करतात. त्याने मॉडर्न महाविद्यालयातून एम.ए.चे शिक्षण पूर्ण केले. तो अकरावीत असताना त्याला नोकरी लावण्यासाठी त्याच्या वडिलांनी ओळखीच्या अशोक मोडा खोकर उर्फ अश्फाक शेख (वय ४१, रा. ताडीवाला रस्ता) याला ७० हजार रुपये दिले होते. शेख याने रूपकुमारला पोलीस आयुक्तालयात नोकरी लावण्यासाठी म्हणून ही रक्कम घेतली. मात्र, नोकरी न लावता फसवणूक केली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. गुन्हा दाखल झाला. न्यायालयात खटला सुरू झाला. पण, तारखांवर तारखा सुरू होत्या. शेवटी तक्रारदार आणि आरोपी यांनी हा खटला लोकन्यायालयात तडजोडीने मिटविण्याचे ठरविले.
राज्यात ८ मार्च २००८ रोजी झालेल्या महालोकअदालतीमध्ये हा खटला तडजोडीसाठी ठेवण्यात आला. शेख याने रक्कम हप्त्याने देण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानुसार त्याने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खडकी येथील शाखेत महिन्याच्या दहा तारखेपर्यंत हप्त्याने रक्कम भरू, असे मान्य केले. ही रक्कम परत न केल्यास दिवाणी कारवाई करून बँकेच्या दराप्रमाणे व्याजासह वसूल करू शकतील. त्याच बरोबर फसवणूक आणि विश्वासघात केल्याबद्दल फौजदारी कारवाई करू शकतील, असे लिहून दिले होते. पण, शेखने एकही हप्ता बँकेत भरला नाही. त्यामुळे रूपकुमार याने पुन्हा पोलिसांकडे तक्रार केली. न्यायालयाने शेख विरुद्ध अटक वॉरन्ट काढले आहे. आपणाला न्याय द्यावा म्हणून रूपकुमार पोलीस आयुक्तालयाच्या फेऱ्या मारत आहे. पण, त्या ठिकाणाहून त्याला बंडगार्डन पोलीस ठाण्याला पाठविले जाते. त्या ठिकाणी मात्र त्याला कोणीच दाद देत नसल्याचे रूपकुमार याने सांगितले. त्याने जिद्द सोडलेले नाही. त्याचा कायदेशीर लढा सुरूच आहे.. त्याला न्यायाची प्रतिक्षा आहे.
खटला मागे घेण्यासाठी धमकी
रूपकुमार याने खटला मागे घ्यावा म्हणून आरोपीने त्याला दोन वेळा धमकी दिली आहे. ‘‘न्यायालयाने अटक वॉरन्ट काढल्यानंतरही शेख पोलिसांना सापडत नाही. मात्र, माझ्यासारख्या अंध व्यक्तीला तो दोन वेळा भेटला. त्यावेळी त्याने खटला मागे घे नाही तर त्याचे वाईट परिणाम होतील, अशी धमकी दिली. तरीही मी कायदेशीर लढा सोडलेला नाही. याबाबत पोलीस आयुक्तांना भेटून तक्रार केली आहे. पोलिसांनी त्याला पकडून न्यायालयात हजर करावे आणि मला न्याय मिळवून द्यावा,’’ अशी मागणी रूपकुमार यादव याने केली आहे.