सावकरी पद्धतीने कर्ज दिल्याच्या (मनी लेन्डिरग) आरोपावरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात २१ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळ्यातील एका हॉटेल व्यावसायिकाला व्याजाने रक्कम देऊन नंतर व्याजाकरिता त्रास देणे, धमकावणे अशा प्रकारे मानसिक छळ केला जात होता. त्यात लोणावळ्यातील राजकारणी मंडळी, वकील, व्यावसायिक यांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समवेश असून, या सर्वानी मिळून सुमारे १८ कोटी रुपयांची रक्कम या व्यावसायिकाला व्याजाने दिली असल्याची माहिती पुढे आली आहे.
मुरली गणेश पिल्ले (वय ४८, रा. द्वारकामाई सोसायटी, लोणावळा. मूळचा विल्लोकोरीपिवो, कन्याकुमारी, तमिळनाडू) या हॉटेल व्यावसायिकाने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यावरून संदीप आगरवाल, नसरुद्दीन गंगानी, राजु गदीया, मुस्सा पठान, इंदर पुरोहित, शैलेष आगरवाल, दिनेश गांधी, अनुपमा खन्ना, सत्यम कोळी, सुनील शर्मा, भालचंद्र गणपुले, सुजित, प्रदीप आगरवाल, पदीजा, विजय आगरवाल, नारायण आंबेकर, प्रमोद गायकवाड, होमी मुल्ला, संजय गायकवाड, आनंद नाईक व मनीष कासलीवाला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिल्ले हा लोणावळ्यातील हॉटेलांमध्ये नोकरी करत होता. त्याने २००३ साली काही हॉटेल्स भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतली होती. मार्च २०१३ रोजी त्याने जेजे हॉटेल अ‍ॅन्ड रिसॉर्ट नावाने कंपनी फर्म करून ‘कुमार रिसॉर्ट’ हे हॉटेल मालक कुमार ऐलानी यांच्याकडून मासिक ४५ लाख रुपये भाडेतत्त्वावर चालविण्यात घेतले. हॉटेलचे मासिक भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार, लाइटबिल, देखभाल दुरुस्ती आदी कामांसाठी त्याचे महिन्याला एक कोटीपेक्षा जास्त खर्च होऊ लागला. त्या प्रमाणात व्यावसाय होत नव्हता. त्यामुळे पिल्ले याने स्थानिक राजकारणी व व्यावसायिक तसेच वकील यांच्याशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत मोठय़ा प्रमाणात पसे व्याजाने घेतले व हे पसे परत फेडण्यात अडचणी येऊ लागताच ‘संबंधित व्यक्ती मला व्याजाच्या रकमेसाठी त्रास देत आहेत, मला व माझ्या कुटुंबीयांना धमकी देत आहेत,’ अशा प्रकारची पोलीस ठाण्यात तक्रार देत लोणावळ्यातून पसार झाला. पिल्ले याच्या तक्रारीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात २१ जणांच्या विरोधात २४ डिसेंबरला सावकारी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.