फेसबुकवरून महापुरुषांबाबत आक्षेपार्ह मजकुरानंतर हडपसर भागात निर्माण झालेल्या तणावानंतर एका तरुणाला प्राण गमवावे लागले. या घटनेला पोलिसांची गुप्तचर यंत्रणा व कायदा-सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना आलेले अपयश कारणीभूत आहे, असे मत राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. तणावाचा हा प्रकार सुनियोजित होता व त्यातून जातीय सलोख्याला गालबोट लावण्याचे काम काहींनी केले. त्यामुळे या लोकांवर कठोर कारवाई व्हावी, असेही ते म्हणाले.
फेसबुकवरून महापुरुषांबाबत आपेक्षार्ह मजकूर टाकल्यानंतर शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या. हडपसर भागामध्ये २ जूनला रात्री मोठा तणाव निर्माण झाला होता. एका टोळक्याने मोहसीन शेख या आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेच्या २२ जणांना अटक केली आहे. या संपूर्ण घटनेचा आढावा घेण्यासाठी हकीम पुण्यात आले होते. हडपसर व भोसरी भागामध्ये त्यांनी पाहणी करून नागरिकांच्या भेटी घेतल्या. त्याचप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन आढावा घेतला.
हकीम म्हणाले, की जातीय सलोखा बिघडविण्याच्या दृष्टीने हा प्रकार करणाऱ्यांना यश आले नाही. पुणेकरांनी दाखविलेला संयम व येथील संस्कृती अशा गोष्टींना थारा देणार नाही, हे दाखवून दिले आहे. फेसबुकवर आक्षेपार्ह गोष्टी कुणी टाकल्या हे माहीत नाही. पण, त्याचा फायदा घेऊन हिंदूू राष्ट्र सेनेने वातावण दूषित करण्याचे काम केले. संघटनेचा प्रमुख धनंजय देसाई हा वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती पोलिसांना असतानाही त्यावर कारवाई का झाली नाही. पोलीस यंत्रणा सतर्क साहिली असती, तर मोहसीनचे प्राण वाचले असते. अल्पसंख्यांक आयोगाने केलेला पाहणी दौरा व प्रत्यक्ष स्थितीबाबतचा अहवाल दोन दिवसांत राज्य शासनाला सादर करणार आहोत.