रवींद्र बऱ्हाटेंसह दोघांवर गुन्हा

 

पुणे : सिंहगड टेक्निकल एज्युकेश सोसायटीचे संचालक मारुती नवले यांना धमकावून त्यांच्याकडून ४० लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी  रवींद्र बऱ्हाटे यांच्यासह साथीदारावर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बऱ्हाटे यांच्यावर नुकताच कोथरूड भागातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी रवींद्र बऱ्हाटे आणि सिद्धार्थ डांगी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड संस्थेचे संचालक मारुती नवले (वय ७१) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. २०११ मध्ये चैनसुख गांधी यांनी माझ्या विरोधात डेक्कन पोलिसांकडे मुळशीतील अंबडवेट येथील पवन गांधी चॅरिटेबल ट्रस्टची ११ एकर जागेची बनावट कागदपत्रे तयार करून जमीन बळकावल्याची तक्रार दिली होती. याप्रकरणात माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गांधी यांनी बऱ्हाटे यांच्या सांगण्यावरून माझ्याविरोधात तक्रार दिली होती. बऱ्हाटे याप्रकरणाचा पाठपुरावा करत होता तसेच मला खंडणीसाठी  धमकावत होता, असे नवले यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

बऱ्हाटे आणि डांगी माझ्या कार्यालयात आले. त्यांनी त्वरित ५० लाख रुपये द्या, असे सांगितले. मी घाबरून रोख २० लाख रुपये आणि २० लाखांची सोन्याची बिस्किटे आणून बऱ्हाटेला दिली. गेल्या पंधरा दिवसात बऱ्हाटे विरोधात शहरातील कोथरूड तसेच अन्य पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याचे वाचनात आल्यानंतर मी पोलिसांकडे तक्रार देण्याचे ठरवले, असे नवले यांनी म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड याप्रकरणाचा तपास करत आहेत.