महिलेवर कात्रीने वार करून पसार होणाऱ्या चोरटय़ाला कोंढवा पोलिसांनी गजाआड केले आहे. महंमदवाडी येथे मंगळवारी (२४ मार्च) सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला.
नवनाथ दामोदर होनमाने (वय २१, रा. महंमदवाडी) असे अटक केलेल्या चोरटय़ाचे नाव आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही महिला एकटी असताना चोरटय़ाने सज्जातून (बाल्कनी) घरामध्ये प्रवेश केला. सोने आणि पैसे दे अशी मागणी त्याने केली. घाबरलेली ही महिला पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना नवनाथ याने तिच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर कात्रीने वार केले. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारांसाठी दाखल केल्यामुळे गुन्हा उशिराने दाखल झाला. नवनाथ हा रंगारी असून ही महिला ज्या इमारतीमध्ये वास्तव्यास आहे तेथे तो रंगकाम करण्यासाठी गेला होता. इमारतीच्या रखवालदारांनी नवनाथला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. माने पुढील तपास करीत आहेत.
बांधकाम कामगाराच्या मृत्यूप्रकरणी
ठेकेदाराला अटक
बांधकामाच्या ठिकाणी काम करताना कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला अटक करण्यात आली आहे. पोलीस तपासामध्ये या घटनेला ठेकेदार जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
संजित मेघनाथ शरण (वय ३५, रा. लेबर कॅम्प, बावधन) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. बळीराम दगडू म्हेत्रे (वय ३३, रा. वाबधन, विठ्ठल दगडे चाळ, िहजवडी) असे अटक करण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. या प्रकरणी िहजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, िहजवडी राजीव गांधी आयटी पार्क फेज क्रमांक १ मध्ये फ्लॅगशिप कन्स्ट्रक्शन येथील बी ४ या ठिकाणी बांधकाम सुरू होते. नवव्या मजल्याच्या ठिकाणी शरण हा विटा घेऊन जात होता. मोकळ्या जागेतून तोल जाऊन तो खाली पडला. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या शरणचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ठेकेदार बळीराम म्हेत्रे याने कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणतेही साहित्य न लावल्यामुळे शरण याचा मृत्यू झाला. त्यामुळे म्हत्रे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पी. बी. भस्मे पुढील तपास करीत आहेत.
मोटारीच्या काचा फोडून ऐवज
लांबविणारे दोन चोरटे जेरबंद
शहराच्या मध्यवस्तीत लावण्यात आलेल्या मोटारीच्या काचा फोडून ऐवज लांबविणाऱ्या दोघा चोरटय़ांना खडक पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले असून चोरटय़ांकडून लॅपटॉप आणि रोजनिशी (डायरी) असा ३० हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या टोळीने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले असल्याचा संशय पोलिसांना आहे.
दीपक ऊर्फ चिंटू धनराज सोलोमन (वय २१) आणि सूरज पांडुरंग वैरागर (वय २३, दोघेही रा. हरकानगर, विनय हायस्कूलसमोर, भवानी पेठ) अशी जेरबंद केलेल्या चोरटय़ांची नावे आहेत. या प्रकरणी त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई येथील पवई परिसरात राहणारे समीर पूनावाला (वय २६) यांनी भवानी पेठेतील जुना मोटर स्टँड परिसरामध्ये त्यांची मोटार लावली होती. ५ मार्च रोजी सोलोमन, वैरागर आणि त्यांच्या साथीदाराने या मोटारीची काच फोडून लॅपटॉप, कागदपत्रे घेऊन ते फरार झाले. या गुन्ह्य़ाचा तपास खडक पोलिसांनी सुरू केला. पथकातील पोलीस कर्मचारी अमोल पवार यांना सोलोमन आणि वैरागर यांनी मोटारीच्या काचा फोडून चोरी केल्याची माहिती मिळाली. शंकरशेठ रस्त्यावर या दोघांना पडकण्यात आले. त्यांनी अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने मोटारीच्या काचा फोडून ऐवज लांबविल्याचे आणखी काही गुन्हे केले असल्याची माहिती मिळाली आहे. अतिरिक्त आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, उपायुक्त एम. बी. तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, उपनिरीक्षक संजय गायकवाड, हवालदार शैलेश जगताप, अमोल पवार, अजय थोरात, महेंद्र पवार यांनी ही कामगिरी केली.
रेल्वेवर दरोडा घालण्याच्या तयारीमध्ये
असलेल्या चोरटय़ांना अटक
संगम पूल परिसरात धावत्या रेल्वेमध्ये चढून दरोडा घालण्याच्या तयारीमध्ये असलेल्या चोरटय़ांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीक्ष्ण शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
अल्ताफ ऊर्फ बचक्या इक्बाल पठाण (वय २८, रा. कोंढवा), अर्जुनसिंग इंदरसिंग सिसोदिया (वय २४, रा. बेलकरवस्ती, मांजरीगाव) आणि समशाद खलील अन्सारी (वय २४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पठाण, सिसोदिया आणि अन्सारी हे तिघे गुरुवारी (२६ मार्च) रात्री संगम पूल परिसरात थांबले होते. तेथून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये चढून ते प्रवाशांना लुटणार होते. याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली आणि त्यांनी सापळा रचून त्यांना जेरबंद केले. अंधाराचा फायदा घेऊन त्यांचे दोन साथीदार पसार झाले. या तिघांकडून तीक्ष्ण शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. लोहमार्ग पोलीस दलाचे अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभय परमार, उपनिरीक्षक सर्जेराव शिंदे, हवालदार भोसले, रमाकांत कार्ले, सुनील कदम, बेबी थोरात आणि अनिल जुंदरे यांनी ही कारवाई केली.
पत्ता विचारण्याचा बहाणा
करून युवकाला लुबाडले
बसची वाट पाहात थांबलेल्या युवकाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन तरुण आणि दोन तरुणींनी लुबाडले. िपपरीतील वल्लभनगर येथे गुरुवारी पहाटे ही घटना घडली.
सुनील सुगमारम (वय २८, रा. िपपरी) यांनी या प्रकरणी िपपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील हा िपपरीतील वल्लभनगर येथील बसथांब्यावर बसची वाट पाहात थांबला होता. दोन दुचाकींवर स्वार झालेले दोन तरुण आणि दोन तरुणी असे चौघे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याच्याजवळ आले. त्यांनी सुनीलजवळील दोन भ्रमणध्वनी, चष्मा आणि अंगठी असा १६ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेऊन तेथून ते पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र कदम पुढील तपास करीत आहेत.