घोरपडीतील भाजी मार्केट येथे मध्यरात्री मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्या तरुणांना हटकल्यामुळे त्यांनी गस्तीवरील दोन पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात एका पोलिसाच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दुसऱ्या पोलीस शिपायाच्या हातावर वार झाले आहेत. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी चौघांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून एकास अटक केली आहे.
साहेबराव कोडग आणि पद्माकर भानुदास शेलार अशी जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी नावे आहेत. त्यांच्यावर खुनी हल्ला केल्याच्या आरोपावरून मोहन रामचंद्र पवार (रा. ८८९, नाना पेठ), नयन गणेश पाटोळे (रा. ७४०, नाना पेठ), पॉल विल्सन जोसेफ दास (रा. वाडकर मळा, हडपसर) आणि राजेश नायक (रा. घोरपडीगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पैकी नायक याला पोलिसांनी अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडीगाव भागात कोडग आणि शेलार हे मोटारसायकलवरून रात्री गस्त घालीत असतात. भाजी मार्केट येथे काही तरुण मद्यपान करून गोंधळ घालत असल्याची माहिती त्यांना मिळाल्याने त्या ठिकाणी दोघे गेले. त्या वेळी आरोपी हे नायक याच्या वाढदिवसाचा आनंद व्यक्त करण्यासाठी मद्यपान करून गोंधळ घालीत होते. कोडग आणि शेलार यांनी त्यांना जाण्यात सांगितल्यानंतर आरोपी गेले. मात्र, पोलीस जाताच पुन्हा परत त्या ठिकाणी आले. पुन्हा मद्यपान करून गोंधळ सुरू केला.
कोडग आणि शेलार हे त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना पुन्हा हे आरोपी दिसले. त्यांनी आरोपींना त्या ठिकाणाहून जाण्यास सांगितले. त्यांना राग आल्यामुळे आरोपींनी त्यांची मोटारसायकल अडविली. त्यांना शिवीगाळ आणि हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. शेलार हे मोटारसायकल चालवीत होते. तर कोडग हे पाठीमागे बसलेले होते. त्यांच्याजवळ कार्बाइन होती. वादवादी सुरू झाल्यानंतर अचानक पाटोळे आणि पॉल यांनी त्यांच्याजवळील कोयता काढून कोडग यांच्या डोक्यात पाठीमागून वार केले. त्यांच्या डोक्यात, कानावर गंभीर जखम झाली. त्या वेळी शेलार यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हातावर वार झाले. वार केल्यानंतर आरोपी हे त्या ठिकाणाहून पळून गेले. नागरिकांनी दोघांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. कोडग हे या हल्ल्यात गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे स्टेशन जवळील एका रुग्णालयात नायक हा कूक म्हणून काम करतो. तर, पॉल ‘पे अ‍ॅन्ड पार्क’चे पैसे गोळा करण्याचे काम करतो. पवार आणि पाटोळे हे बेकार आहेत. पोलीस या आरोपींचा शोध सुरू आहेत.