हातात नंग्या तलवारी, धारदार कोयते घेऊन दुचाकी वाहनांवर ट्रिपल सीट बसून १५-२० जणांचे टोळके येते काय आणि तोडफोड करून क्षणात निघूनही जाते, हे प्रकार पिंपरी-चिंचवड शहरात वाढू लागले आहेत. काही संबंध नसताना रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना मारहाण केली जाते. रस्त्यावर लावलेली वाहने फोडली जातात. महिनाभरात अशा घटना सातत्याने घडल्या आहेत. मंगळवारी रात्री शाहूनगर-संभाजीनगर परिसरात अशाच टोळक्याने घातलेला धुडगूस पाहता शहरातील कायदा सुव्यवस्थेचे ‘तीन तेरा’ वाजल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
दोन गटाच्या वादात नऊ ऑक्टोबरला भोसरीत राडा झाला. आकुर्डी-मोहननगर भागातील एका टोळक्याने भोसरीत सशस्त्र हल्ला चढवला. त्या वेळी त्यांनी गाडय़ांची, दुकानांची तोडफोड केली. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना मारहाणही केली. २३ ऑक्टोबरला एकाच दिवशी तीन घटना घडल्या. काळेवाडीत बेकरीत घुसून तोडफोड  करण्यात आली. रात्री डीलक्स सिनेमा चौकात दगडफेक व गाडय़ांची मोडतोड झाली. त्याच वेळी चिंचवडमध्येही तोडफोड झाल्याची नोंद आहे. मंगळवारी रात्री १०-१२ जणांचे टोळके दुचाकीवर शाहूनगर व संभाजीनगरमध्ये आले, त्यांनी चालत्या गाडय़ांवरून मोटारी फोडल्या तसेच दुकानांची तोडफोड झाली. यातील काही घटना  सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. ठरावीक कालावधीनंतर या घटना होत आहेत. १६ ते २५ वयोगटातील मुलांचा यात भरणा असल्याचे सांगण्यात येते. पोलिसांचा धाक राहिलेला नाही. काही घटनांमध्ये पोलिसांवर राजकीय दबाव आहे. तर, राजकारण्यांच्या नावाखाली पोलीसही खाबुगिरी करतात, हे उघड गुपित आहे. एके काळी शांत शहर म्हणून प्रतिमा असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी कारवाया प्रचंड वाढल्या आहेत. छोटय़ा-छोटय़ा गोष्टींवर धारदार शस्त्र घेऊन टोळक्याने रस्त्यावर येण्याचे, वेळप्रसंगी खून करण्यापर्यंतचे प्रकार सर्रास सुरू आहेत. या घटनांना पायबंद घालण्यासाठी आर्थिक लागेबांधे व राजकीय हितसंबंधांचा विचार न करता पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पिंपरी महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी पालिकेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना, शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या विषयावरून अजितदादांसमोरच तीव्र चिंता व्यक्त केली होती. शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय असले पाहिजे व ते तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे, अशी सूचनाही केली होती. राजकीय पातळीवर या मुद्दय़ाचा विचार व्हावा, असा सूर नागरिकांमधून व्यक्त होतो आहे.