घराचा दरवाजा कटावणीच्या साहाय्याने तोडून व घरातील लोकांना चाकूचा धाक दाखवून सोन्या-चांदीचे दागिने पळवून नेण्याच्या घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास बाणेर, सांगवी व पुनावळे या भागात घडल्या. चारही घटनांमध्ये पाच ते सहा चोरटय़ांचा सहभाग असून, गुन्ह्य़ाचा प्रकारही एकच आहे. तीन घटनांमध्ये हे चोरटे पांढऱ्या रंगाच्या ओमनी व्हॅनमधून आल्याची माहिती फिर्यादीत देण्यात आली आहे.
सांगवी येथील विशालनगर भागामध्ये पहाटे सव्वातीनच्या सुमारास ओमनी व्हॅनमधून आलेल्या पाच ते सहा चोरटय़ांनी एका घराचा दरवाजा कटावणीने तोडला. घरात शिरून त्यांनी घरातील व्यक्तींचा हत्याराचा धाक दाखविला. काहींना मारहाणही केली व एका महिलेचा विनयभंग केला. त्यानंतर घरातील सोन्याच्या दागिन्यांसह एक लाख ८० हजारांचा ऐवज चोरला. याच घराच्या शेजारील घराचा दरवाजाही चोरटय़ांनी तोडला व तेथेही हत्याराचा धाक दाखवून ५० हजार रुपये किमतीचे दागिने पळविले.
बाणेर येथील क्रिस्टल गार्डन येथील इमारतीतील सुषमा बकुल याज्ञिक (वय ४५) यांच्या सदनिकेचा दरवाजाही चोरटय़ांनी तोडला. याज्ञिक यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील एक लाख ४५ हजार रुपये किमतीचे दागिने पळवून नेले.
हिंजवडी पोलीस ठाण्यांतर्गत पुनावळे येथील क्लासिक सोसायटीमधील घरफोडीबाबत शिवराम ज्ञानोबा ढवळे (वय ४५) यांनी फिर्याद दिली आहे. ओमनी व्हॅनमधून आलेले पाच ते सहा चोरटे दार तोडून ढवळे यांच्या घरात शिरले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते. चोरटय़ांनी घरातील व्यक्तींना चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने व मोबाइल, असा एक लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.