महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची वाट लागली आहे. गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली नसून पोलिसांना गृहमंत्र्यांचा धाक नाही. तरीही मुख्यमंत्र्यांचा गृहखाते स्वत:कडे ठेवण्याचा अट्टहास आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चिंचवड येथे बोलताना केली.
चिंचवडमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत असून मागासवर्गीयांवर हल्ले होत आहेत. रस्त्यांवर खुलेआम खून, दरोडे पडत आहेत. व्यापाऱ्यांची लूट होत आहे, माणसे कापली जात आहेत. सलगपणे गुन्हेगारी घटना होत असून महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती राहिली नाही. गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिलेली नाही. पोलीस डान्सबारमध्ये आरोपींना नेतात. नागपूरचे कैदी जेलमधून पळाले. गृहखात्याचे अपयश अधिवेशनात मांडले. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा इशारा मुंडे यांनी दिला.
अजितदादांच्या चौकशीचा विषय सरकारकडून सातत्याने काढला जातो. आमचे नेतृत्व साफ आहे. त्यांनी चौकशीला कधीही नकार दिला नाही. ते निर्दोष सुटतील. मात्र, आरोप करून पक्ष बदनाम करण्याचे राजकारण खेळले जात आहे. एकदा काय ती चौकशी करा म्हणजे ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होईल. केवळ घोषणा करणाऱ्या सरकारने शेतक ऱ्यांना मदत केलीच नाही. शेतक ऱ्यांची ते चेष्टा करत आहेत. युती सरकारमध्ये कसलाही ताळमेळ नाही. आघाडी सरकारच्या नावाने खापर फोडून ते पळवाट शोधत आहेत. लाटेत निवडून आलेले हे सरकार म्हणजे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.